पाकमध्ये लष्करी बंडाची शक्यता | पुढारी

पाकमध्ये लष्करी बंडाची शक्यता

इस्लामाबाद : वृत्तसंस्था : आर्थिक संकटामुळे आयएमएफसमोर नांगी टाकत संरक्षण खर्चात करण्यात आलेली कपात, इम्रान खान यांचा वाढत चाललेला प्रभाव आणि दहशतवादी कारवायांत झालेली वाढ यामुळे पाकिस्तानात लष्कराचे बंड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिहेरी संकटांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या लष्कराने उच्चपदस्थ अधिकार्‍यांची बैठक घेतली. लष्करी कमांडरच्या या बैठकीमुळे देशात संभाव्य लष्करी बंडाचे संकेत मिळत आहेत.

पाकिस्तानची पावले पुन्हा एकदा लष्करी राजवटीच्या दिशेने पडू लागली आहेत. आर्थिक डबघाई, इम्रान खान समर्थक आणि सुरक्षा दलातील वाद तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून ‘बेलआऊट’ मिळवण्यासाठी लष्करी तरतुदीत कपातीसाठी येत असलेला दबाव या सार्‍या पार्श्वभूमीवर लष्करी कमांडरची परिषद होत आहे. मुख्यत: लष्करी तरतुदीतील कपातीच्या मुद्द्यावरून सेना दलात नाराजी उद्भवली आहे. इम्रान खान समर्थक आणि सुरक्षा दलातील वादाचा कल लष्करी राजवटीच्या उपायाकडे अधिक वळत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात पाकिस्तानी लष्कर चौथ्यांदा सत्ता काबीज करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कमांडर्स कॉन्फरन्समध्ये लष्करी खर्च कपातीवर चर्चा होणार आहे. ‘आयएमएफ’ने पाकिस्तानला कर्ज देण्यापूर्वी संरक्षण तरतुदीत कपात आणि लष्करी खर्च कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला. सरकारने तसा निर्णय घेण्याचे संकेत दिल्याने लष्करात शाहबाज सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शरीफ यांच्याकडून लष्कराचे मन वळवण्याचे प्रयत्न होत असले तरी ते पुरेसे नाहीत. पाकिस्तानच्या 75 वर्षांच्या इतिहासात लष्कराने तीन वेळा सत्ता ताब्यात घेतली आणि सुमारे 40 वर्षे थेट शासन केले आहे.

इम्रान खान यांचा प्रभाव धोक्याचा

इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांच्यात आणि लष्करात वितुष्ट आले होते. सत्तेवरून पायउतार झाल्यावर इम्रान यांच्या मुसक्या आवळण्यात शाहबाज सरकारला यश आले नाही. उलट इम्रान यांच्या पक्षाची ताकद वाढत असून देशभर सरकारविरोधी वातावरण तयार करण्यात त्यांना यश आले आहे. इम्रान यांना अटक करण्यात सरकार अपयशी ठरल्याने लष्कर शाहबाज सरकारवर नाराज आहे. इम्रान यांनी आगामी निवडणुकीत सत्ता काबीज करू नये, अशी लष्कराची इच्छा लपून राहिलेली नाही.

दहशतवादी हल्लेही वाढले

पाकिस्तानात गेल्या वर्षभरात दहशतवादी हल्ल्यात वाढ झाल्याने लष्कराच्या क्षमतेबाबत तेथील जनतेत प्रश्न विचारले जात आहेत. पाकिस्तानात सर्वात शक्तिशाली असलेल्या लष्कराच्या ते पचनी पडले नसून शाहबाज सरकारला आलेले अपयश लष्करासाठी चिंतेची बाब ठरली आहे. पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर पीस स्टडीज या संस्थेच्या मते देशात 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये दहशतवादी हल्ले 27 टक्के वाढले आहेत.
या तिन्ही बाबींचा विचार करता पाकिस्तानी लष्करातील एक मोठा गट बंडाच्या तयारीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कमांडर परिषदेत लष्करी अधिकार्‍यांकडून सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Back to top button