चीनच्या स्पाय बलूनवर अमेरिकेचा एअर स्ट्राईक | पुढारी

चीनच्या स्पाय बलूनवर अमेरिकेचा एअर स्ट्राईक

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : गेल्या आठ दिवसांपासून अमेरिकन आसमंतात घोंघावत असलेल्या चीनच्या स्पाय बलून (हेरगिरी बलून) या संकटावर हल्ला करून अमेरिकन हवाई दलाने अखेर तो नष्ट केला. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. चीनने अमेरिकेच्या या कारवाईला तीव्र हरकत घेतली असून, अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नियमांचा, संकेतांचा भंग केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आम्हालाही आहे, असेही चीनने अमेरिकेला ठणकावले आहे.

बलून पाडण्यापूर्वी अमेरिकेने आपली तिन्ही विमानतळे बंद केली होती. चिनी बलून 60 हजार फुटांवर उडत असताना हवाई दलाच्या लँगले तळावरून अमेरिकेने मारा केला. बलूनचे अवशेष समुद्रात कोसळले.

बलूनच्या मदतीने चीनने अमेरिकेतील कुठली माहिती लांबविली, त्याचा शोध घेण्यासाठी पेंटॅगॉनने बलूनचे अवशेष समुद्राबाहेर काढण्यासाठी नौदल तसेच सागरी सीमा सुरक्षा दलाचे पथक रवाना केले आहे. सर्वात आधी 28 जानेवारी रोजी चीनचा हा बलून अमेरिकन हवाई हद्दीत प्रवेश करताना दिसला होता. यानंतर तो मोटांना परिसरात आढळून आला होता. हा बलून नष्ट करण्यात आलेला असतानाच लॅटिन अमेरिकेत आणखी एक चिनी बलून आढळलेला आहे.

अमेरिकेचा दावा काय?

मोटांना हे अमेरिकेचे आण्विक क्षेपणास्त्र क्षेत्र आहे. येथील माहिती या बलूनच्या माध्यमातून चीनला पाठवली जात असल्याचा कयास अमेरिकन लष्कराने बांधला आणि बलूनवर पाळत ठेवली.

नागरी वापरासाठीचा हा बलून आहे, मग तो 6 हजार कि.मी. लांब मोटांनापर्यंत कसा पोहोचला, याचे चीनकडे काय उत्तर आहे, असा सवाल अमेरिकेकडून करण्यात आला आहे.

चीनचे म्हणणे काय?

चीनने कधीही कुठल्या देशाच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केलेले नाही. चीनला बदनाम करून सोडण्याचा विडाच अमेरिकेने उचलला आहे, अशी प्रतिक्रिया या हल्ल्यानंतर चीनने दिली आहे.

हवामानविषयक माहिती संकलित करणारे हे बलून आहे आणि ते आपल्या मार्गावरून भरकटले एवढेच! अमेरिका मात्र उगीचच ते हेरगिरी बलून असल्याची कथा रंगवत आहे, असा पलटवार चीनने केला आहे.

तीन बसएवढा बलून

बलून नजरेआड झाला तेव्हा त्याचा शोध घेण्यासाठी अमेरिकन लष्कराने 2 एफ-22 फायटर जेट रवाना केले. याच लढाऊ विमानाने बलूनवर हल्ला केला. एका अमेरिकन अधिकार्‍याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार तीन बस मिळून जेवढ्या होतील, तेवढा हा बलून मोठा होता.

बलूनमुळे दौरा रद्द

अमेरिकेच्या आकाशात चीनचे हेरगिरी बलून आढळल्याचा निषेध म्हणून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दोन दिवसांचा नियोजित चीन दौरा रद्द केला आहे. ते दोन दिवसांच्या चीन दौर्‍यावर जाणार होते.

Back to top button