256 पेक्षा अधिक सदस्य असणारे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप आता ‘म्यूट’ होणार | पुढारी

256 पेक्षा अधिक सदस्य असणारे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप आता ‘म्यूट’ होणार

सॅन फ्रान्सिस्को; वृत्तसंस्था :  व्हॉटस्अ‍ॅप गु्रपवर येणार्‍या मेसेजेसच्या नोटिफिकेशनच्या आवाजाला वैतागलेल्या लोकांची सुटका होणार आहे. 256 पेक्षा अधिक सदस्य असलेल्या गु्रपवर आता मेसेज नोटिफिकेशन आपोआप ‘म्यूट’ होणार आहे.

आजच्या काळात व्हॉटस्अ‍ॅप हे संपर्काचे व दळणवळणाचे मोठे साधन बनले आहे. प्रत्येक जण एकापेक्षा अधिक ग्रुपचा सदस्य असतोच असतो. व्हॉटस्अ‍ॅपवर येणार्‍या संदेशांचे नोटिफेकशन देणारा ध्वनी सतत वाजत असतो. त्यात ग्रुपवर चर्चा सुरू असेल, तर सतत आवाज येतच असतो. अनेक ग्रुपचे सदस्य असाल, तर विचारायलाच नको. अशा स्थितीत या आवाजाचा वैताग येतो व वापरकर्ता मर्यादित काळासाठी दुसर्‍या वापरकर्त्याला अथवा ग्रुपला ‘म्यूट’ करतो; पण ठराविक मुदत संपल्यावर आवाज पुन्हा सुरू होतो. या त्रासापासून वापरकर्त्याची सुटका होणार आहे. व्हॉटस्अ‍ॅपने आता 256 पेक्षा अधिक सदस्य असलेल्या ग्रुपचे नोटिफिकेशन ‘म्यूट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू असून, लवकरच ते वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या नवीन फिचरपैकी अनेक ग्रुप्सची मिळून एक कम्युनिटी तयार करण्याचे फिचर आता उपलब्ध झाले आहे. ते अँड्रॉईड, आयओएस आणि वेब या तिन्ही प्रकारांत उपलब्ध झाले आहे. या नवीन फिचरमध्ये एक ‘अनाऊन्समेंट ग्रुप’ व 50 ग्रुप जोडून ‘कम्युनिटी’ तयार करता येईल. ‘अनाऊन्समेंट ग्रुप’मध्ये 5,000 सदस्यांची मर्यादा आहे. एका मोठ्या समुदायापर्यंत माहिती पोहोचवणे यामुळे आणखी सोपे होणार आहे.

Back to top button