Queen Elizabeth : अवघ्या २५ व्या वर्षी एलिजाबेथ बनली ब्रिटनची राणी; ‘या’ निर्णयामुळे मिळाली होती राजगादी | पुढारी

Queen Elizabeth : अवघ्या २५ व्या वर्षी एलिजाबेथ बनली ब्रिटनची राणी; 'या' निर्णयामुळे मिळाली होती राजगादी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले (दि.७सप्टेंंबर). यासंबधीची माहिती बकिंगहॅम पॅलेसने दिली. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी स्कॉटलंडमधील बालमोरल वाड्यात अखेरचा श्वास घेतला. राणी एलिझाबेथ यांच्यानंतर आता राजेशाही प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) यांच्या हाती ब्रिटनची राजसत्ता आली आहे. ते ब्रिटनचे नवे राजे आहेत. राणी एलिझाबेथ यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक देशांचा इतिहास बदलताना पाहिला आहे. तंत्रज्ञानापासून राजकारणापर्यंतचे जग बदलले याच्या त्या साक्षीदार होत्या. ७० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या आयुष्यापेक्षाही अधिक जग झपाट्याने बदलताना पाहिले होते. एलिझाबेथ या एकमेव राणी होत्या ज्यांनी १५ ब्रिटिश पंतप्रधानांना पाहिले तसेच १४ अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना भेटल्या आहेत. जो बिडेन अमेरिकेचे शेवटेचे अध्यक्ष होते ज्यांची राणीने भेट घेतली. एलिझाबेथ यांची ब्रिटनची राणी बनण्याचा किस्सा खूपच वेगळा आहे.

Queen Elizabeth : वयाच्या २५ वर्षी ब्रिटनची राणी

बोवेस-लायन (Bowes-Lyon) आणि अल्बर्ट जॉर्ज विंडसर (Albert George Windsor) यांची पहिली मुलगी म्हणजे एलिझाबेथ. यांचा जन्म १९२६ मध्ये लंडनमध्ये झाला. १९३६ मध्ये त्यांचे काका महाराजा एडवर्ड आठवा (Edward VIII) यांनी वॉलिस सिम्पसन या अमेरिकन सोशलाइटशी लग्न केल्यानंतर एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राजत्याग केला. एलिझाबेथ यांचे वडील जॉर्ज सहावा राजा झाले. यानंतर, 1952 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर, एलिझाबेथ यांना वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी गादी सोपवण्यात आली. वेस्टमिन्स्टर अॅबे येथे त्यांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर राणी म्हणाली, ‘तिचा राज्याभिषेक भविष्यासाठी आशेची घोषणा आहे आणि ती शक्ती किंवा विलासी जीवनाचे प्रतीक नाही. देवाच्या कृपेने मी पुढची वर्षे राणी म्हणून तुमची सेवा करत राहीन.’

Queen Elizabeth : 70 वर्षांचे रहस्य

एलिझाबेथ या ब्रिटनवर सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राणी आहेत. एकूण  70 वर्षे ब्रिटनवर राज्य केले. त्यांनी ब्रिटिश राजकारणाचे अनेक टप्पे पाहिले. 1721 पासून ब्रिटनमध्ये एकूण 79 पंतप्रधान आहेत आणि त्यापैकी 14 पंतप्रधानानी राणीच्या राजवटीत त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. लिझ ट्रस या राणीकडून शपथ घेणार्‍या देशातील 15 व्या आणि तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. विन्स्टन चर्चिल हे राणीच्या राजवटीत काम करणारे पहिले यूकेचे पंतप्रधान होते. 1951 ते 1955 पर्यंत ते पंतप्रधान होते.  विन्स्टन चर्चिल यांचा पहिला टर्म किंग जॉर्ज सहावाच्या काळात होता. संकटकाळात नेव्हिल चेंबरलेन यांनी राजीनामा दिला तेव्हा चर्चिल यांनी पदभार स्वीकारला. यानंतर एलिझाबेथ राणीने अँथनी एडन, हॅराल्ड मॅकमिलन, अॅलेक डग्लस होम, हॅराल्ड विल्सन, एडवर्ड हीथ, जेम्स कॅलाघन, मार्गारेट थॅचर, जॉन मेजर, टोनी ब्लेअर, गॉर्डन ब्राउन, डेव्हिड कॅमेरॉन, थेरेसा मे, बोरिस जॉन्सन आणि लिझ ट्रस या पंतप्रधानांना शपथ दिली.

इडन हे असे पंतप्रधान होते ज्यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक देशांच्या टीकेला सामोरे जावे लागले. इजिप्तने सुएझ कालव्याचे राष्ट्रियीकरण केले. त्या वेळी, ईडनने फ्रान्स आणि इस्रायलसोबत कालवा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. या कामामुळे ईडन यांच्यासह राणीलाही टीकेलाही सामोरे जावे लागले. यामुळे राणीची लोकप्रियताही कमी झाली. इडनने 1957 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला.

अमेरिकेच्या 14 राष्ट्राध्यक्षांचीही भेट

राणीने आपल्या कारकिर्दीत अमेरिकेच्या 14 राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली आहे. वयाच्या २५ व्या वर्षी ब्रिटनची महाराणी झाल्या तेव्हा हॅरी ट्रुमन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. यानंतर ड्वाइट डी. आयझेनहॉवर, जॉन एफ. केनेडी, लिंडन जॉन्सन, रिचर्ड निक्सन, जेराल्ड फोर्ड, जिमी कार्टर, रोनाल्ड रेगन, जॉर्ज बुश सीनियर, बिल क्लिंटन, जॉर्ज बुश जूनियर, बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांनी राणीची भेट घेतली आहे. राणीने 1976 मध्ये व्हाईट हाऊसला भेट दिली होती. त्यांच्या भेटीने अँग्लो-अमेरिकन संबंधांना नवा आकार आला.

तब्बल 110 देशांना भेट

आपल्या 70 वर्षांच्या कार्यकिर्दीत महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांनी 110 देशांना भेटी दिल्या आहेत. त्यांच्या राजवटीत त्यांनी कॉमनवेल्थ देशांची संख्या आठ वरून ५४ झाली. 1991 मध्ये, यूएस काँग्रेसला (United States Congress ) संबोधित करणा-या त्या पहिल्या ब्रिटिश महाराणी होत्या. त्यांच्या कार्यकाळात ब्रिटनची ऐतिहासिक कामगिरी म्हणजे त्यांनी 300 वर्षे जुना कायदा रद्द केला. या निर्णयामुळे राजेशाहीत मुलींनाही समान अधिकार मिळाले. राणी एलिझाबेथबद्दल ब्रिटनच्या राजकारणातील विचारवंताचे म्हणणे आहे की, राणीलाही एकटेपणाचे दुःख सहन करावे लागले आहे. पण त्यांनी कधीच आपली समस्या जगाला सांगितली नाही. ती नेहमी हसतमुखपणे भेटायची आणि तिचे हसणे नेहमीच सर्वांच्या हृदयावर राज्य करायचे.

हेही वाचलंत का?

Back to top button