न्यू यॉर्कमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड, आठवड्याभरातील दुसरी घटना

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यू यॉर्कमधील क्वीन्स येथील एका मंदिराबाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्याची काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याचे समोर आले आहे. दोन आठवड्यांतील ही दुसरी घटना आहे. न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास सहा जणांनी महात्मा गांधी यांची पुतळ्याची तोडफोड केली. तसेच तोडफोडीनंतर पेंटच्या माध्यमातून काही अपशब्दही लिहिले आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी 3 ऑगस्ट रोजी श्री तुळशी मंदिराबाहेर 7 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा असाच एक प्रकार क्वीन्स येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशीरा हल्लेखोरांनी हतोड्याच्या सहाय्याने महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केली. हे हल्लेखोर 25 ते 30 वयोगटातील आहेत. पोलिसांनी या प्रकाराचा एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे संशयित दोन वेगवेगळ्या चारचाकीतून घटनास्थळी पोहचले आणि पुतळ्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. पुतळा जमीनीवर पाडल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीचे सदस्य जेनिफर राजकुमार यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याचे आवाहन त्यांनी स्थानिक पोलिसांना केले. दुसरीकडे, मंदिराचे संस्थापक पंडित महाराज यांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितले की, “गांधी हे अहिंसा आणि शांतीचे प्रतिक असून त्यांचे विचार सर्वांना प्रेरणादायी आहेत. मात्र, अशा माणसाच्या पुतळ्यांना लक्ष्य करून तोडफोड करणे या घटना खूप दुःखद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Mahatma Gandhi)

Exit mobile version