विरोधात बोलणार्‍यांचा चीनमध्ये मानसिक छळ | पुढारी

विरोधात बोलणार्‍यांचा चीनमध्ये मानसिक छळ

माद्रिद ः वृत्तसंस्था सरकारविरोधात कोणत्याही प्रकारची टिप्पणी केल्यास समाजसेवक, पत्रकारांसह अन्य लोकांचा अनन्वित छळ करून त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठविण्याची शिक्षा चीनकडून दिली जात असल्याचा दावा स्पेनमधील सेफगार्ड डिफेंडर्स या मानवाधिकार संघटनेने केला आहे. सरकारी आरोग्य अधिकार्‍यांशी हातमिळवणी करत नागरिकांना टॉर्चर केले जात असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. सरकारविरोधात बोलल्यास कठोर शिक्षा न देण्याचा कायदा 10 वर्षांपूर्वीच मंजूर केला असतानाही चीनचा कम्युनिस्ट पक्ष नागरिकांवर दबाव टाकून आपल्या क्रुरतेचे दर्शन घडवत आहे.

मानसोपचार रुग्णालयात एखाद्याला दाखल केल्यानंतर त्याला मारहाण केली जाते. इलेक्ट्रिक शॉक दिला जातो. इतकेच नव्हे, तर पीडिताला अनेक महिने एका खोलीत डांबून ठेवले जाते, असे सेफगार्ड डिफेंडर्स संघटनेने म्हटले आहे. चीनमधील स्थितीबाबतचा हा अहवाल या संघटनने पीडितांच्या ऑनलाईन मुलाखतीनंतर तयार केला आहे. दरम्यान, 1018 मध्ये एका महिलेने राष्ट्राध्यक्ष शी-जिनपिंग यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर ती महिला बेपत्ता झाली होती. काही वर्षांनंतर त्या महिलेला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समोर आले होते. चीनमध्ये नागरिकांचे हक्कहिरावून घेतले जात असून याबाबत कोणत्याच प्रकरची न्यायालयीन सुनावणी घेतली जात नसल्याचे अहवालातून समोर आले.

दुर्बल घटकांतील लोकांचाच मोठ्याप्रमाणात मानसिक छळ होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जे लोक बोलतात तेच न्यायालयात याचिका दाखल करतात; मात्र सरकारविरोधात लढण्यासाठी त्यांच्याकडे ताकत आणि पैसा नसतो. त्यामुळे अशा लोकांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचे चीनमध्ये नित्याचेच झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Back to top button