‘गूगल, फेसबूक लोकशाहीसाठी धोका’ | पुढारी | पुढारी

'गूगल, फेसबूक लोकशाहीसाठी धोका' | पुढारी

दावोस : पुढारी ऑनलाईन

गूगल आणि फेसबूकसारख्या दिग्‍गज कंपन्यांनी इंटरनेट विश्व व्यापले आहे. मात्र, या कंपन्यांची एकाधिकारशाही नवीन उद्योजकांसाठी बाधा ठरत आहे. तसेच सोशल मीडिया कंपन्यांमुळे लोकशाही व्यवस्‍थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे सांगत अमेरिकन अब्‍जाधीश जॉर्ज सोरोस यांनी सोशल मीडिया कंपन्यांबाबत इशारा दिला आहे.

दाओस येथील वर्ल्‍ड इकॉनॉमिक फोरमच्या एका वार्षीक कार्यक्रमात सोरोस बोलत होते. ते हंगेरीतून अमेरिकेत स्‍थलांतरीत झालेले अब्‍जाधीश आहेत. अमेरिकेतील दिग्‍गज आयटी कंपन्या अंतिम श्वास घेत आहेत, असे ते यावेळी म्‍हणाले.

सोशल मीडिया कंपन्या आता लोकांनी काय विचार करावा, कसे वागावे हे ठरवू लागल्या आहेत. याबाबत लोक नकळत सोशल मीडियाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या कामकाजावर याचे दूरगामी वाईट परिणाम होऊ शकतात. विशेषत: निवडणुकांवर सोशल मीडियाच्या अधिक वाईट परिणाम होणार आहे, असे ते म्‍हणाले. 

फेसबूक आणि इतर सोशल मीडियाची अमेरिकेच्या २०१६ सालच्या राष्‍ट्रध्यक्ष निवडणुकीतील प्रभावाबाबत चौकशी सुरू आहे. नेमकी याचवेळी सोरोस यांच्या या टिपण्‍णीला अधिक महत्त्‍व प्राप्‍त होते.
जगभरातील लोकशाही आणि मानवाधिकाराच्या समर्थनासाठी सोरोस यांनी ओपन सोसायटी फाऊंडेशनची स्‍थापना केली. यावेळी ते म्‍हणाले की, सोशल मीडिया कंपन्या जाणिवपूर्वक लोकांना आपल्या सेवेची सवय लावतात. ही सवय एखाद्या व्यसनाप्रमाणेच असते. हे किशोरवयीन मुलांसाठी चिंताजनक आहे. 

Back to top button