काबूलमध्ये रुग्णवाहिकेत स्फोट; ६३ ठार, १६१ जखमी | पुढारी

काबूलमध्ये रुग्णवाहिकेत स्फोट; ६३ ठार, १६१ जखमी

काबूल : वृत्तसंस्था

काबूलमध्ये शनिवारी एका रुग्णवाहिकेत दहशतवाद्यांनी घडवलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 63 जणांचा मृत्यू झाला असून, 161 नागरिक जखमी झाले आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

येथील एका पोलीस तपासणी नाक्याजवळ हा स्फोट झाला. काबूलमधील संसद प्रतिनिधी मीरवाईस यासिनी या स्फोटाच्यावेळी घटनास्थळाजवळ उपस्थित होते. हल्लेखोर दहशतवादी स्फोटकांनी भरलेल्या एका रुग्णवाहिकेध्ये बसून आले आणि तपासणी नाक्याजवळ गर्दी असलेल्या गल्लीमध्ये घुसले. तेथेच त्यांनी स्फोट घडवला. या तपासणी नाक्यापासून जवळच असलेल्या परिसरात अनेक सरकारी इमारती आणि विविध देशांचे दूतावास आहेत.काही दिवसांपूर्वीच काबूलमधील इंटरकाँटिनेंटल हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटात 20 जण मृत्युमुखी पडले होते. त्यापूर्वी मंगळवारी तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलमधील इंटरकाँटिनेंटल हॉटेलवर केलेल्या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 13 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर जलालबाद येथील लहान मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेच्या कार्यालयात झालेल्या स्फोटात 11 जण जखमी झाले होते.

Back to top button