‘टेस्ला’चे अध्यक्ष एलॉन मस्क राजीनामा देणार | पुढारी

'टेस्ला'चे अध्यक्ष एलॉन मस्क राजीनामा देणार

वॉशिग्टन : पुढारी ऑनलाईन

कंपनीच्या खासगीकरण करण्यासंदर्भात ट्विटरवरून दिशाभूल करून गोत्यात आल्याने इलेक्ट्रीक कार उत्पादनातील बलाढ्य कंपनी असलेल्या ‘टेस्ला’च्या अध्यक्ष पदावरून एलॉन मस्क यांना पायउतार व्हावे लागणार आहे. एलॉन ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा आहेत. अमेरिकन ‘सेक्युरिटी ॲण्ड एक्सेंज कमिशन’ (एसईसी) दिलेल्या माहितीनुसार एलॉन यांनी दिशाभूल केल्याप्रकरणी दोन कोटी डॉलर दंड भरण्यास सहमती दर्शवली आहे. 

दरम्यान ‘टेस्ला’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर एलॉन मस्क कायम राहतील. ऑगस्ट महिन्यात ७ तारखेला मस्क यांनी कंपनीच्या खासगीकरण संदर्भात ट्विट केले होते. त्यानंतर एका आठवड्यातच त्यांनी कोणतीही माहिती न देता निर्णय फिरवला आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नव्हते, या प्रकारामुळे मार्केटमध्ये द्विधा अवस्था निर्माण होऊन गुंतणवणुकदारांमध्ये अविश्वास निर्माण झाला असा ‘एसईसी’ने मस्क यांच्यावर आरोप ठेवला. 

‘एसईसी’ने दिलेल्या या दणक्यामुळे मस्क यांना ४५ दिवसांमध्ये अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. तसेच आगामी तीन वर्ष त्यांना अध्यक्षपदावर निवडता येणार नाही. त्याचबरोबर ‘टेस्ला’ला दोन स्वतंत्र संचालकांची नेमणुक करावी लागणार आहे. ‘एसईसी’ने दिलेल्या दणक्यावर ‘टेस्ला’ प्रशासनाकडून तसेच एलॉन मस्क यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 

Back to top button