पाकिस्तान ही दहशतवादाची जन्मभूमीही, कर्मभूमीही! | पुढारी

पाकिस्तान ही दहशतवादाची जन्मभूमीही, कर्मभूमीही!

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

पाकिस्तानातील पूर्वीच्या विविध सरकारांनी आपआपल्या काळात तालिबानच्या सहकार्याने जगभरात दहशतवादाला प्रोत्साहन दिले, अशी धक्कादायक कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. सोमवारी ‘कौन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्स’समोर बोलताना त्यांनी अनेक खळबळजनक वक्तव्ये केली. पाकसमवेत संगनमताने दहशतवादाला खतपाणी घातल्याचे खापरही खान यांनी अमेरिकेवर फोडले.

सोमवारच्या या कार्यक्रमात इम्रान खान यांना मान खाली घालायला लावणार्‍या अनेक प्रश्नांचा सामनाही करावा लागला. पाकिस्तानातील दहशतवादाच्या विषयावर त्यांनी अमेरिकेलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. स्वत:च्या बचावाच्या नादात अमेरिकेवर खापर फोडताना ते हेही विसरले, की ते अमेरिकेतच आहेत. चीनच्या हालचाली पाहता पाकिस्तान चीनला पूर्णपणे अंकित झालेला आहे, असे दिसते, यावर बोट ठेवले असता इम्रान यांनी हा प्रश्न उडवून लावला.

अमेरिकेतील कौन्सिल ऑफ फॉरेन रिलेशनचे अध्यक्ष रिचर्ड एन. हॅस यांच्याशी ते बोलत होते. चीन पाकला भरमसाट कर्ज देत आहे. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला त्यामुळे धोका नाही काय, या प्रश्नावर इम्रान म्हणाले, की तो आमच्या वाईट काळातला दोस्त आहे. अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री मॅटिस यांच्या, धार्मिक कट्टरवादामध्ये पाकिस्तान जगात आघाडीवर आहे, या वक्तव्यावर इम्रान यांना त्यांचे मत विचारण्यात आले असता ते म्हणाले की, 1980 मध्ये अमेरिकेच्या मदतीने पाकने सोव्हियत युनियनविरोधात जिहाद केला. रोनाल्ड रेगनही जिहाद हे महान तत्त्व आहे, असे तेव्हा म्हणाले होते, त्याची आठवण इम्रान यांनी करून दिली.

नाईन-इलेव्हनपूर्वी अमेरिकेनेच जिहादींचे रूपांतर दहशतवाद्यांत  होण्यात मदत केली होती. तरीही अमेरिकेला साथ देऊन पाकिस्तानने मोठी चूक केली. आमच्या अर्थव्यवस्थेला 200 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. तरी अफगाणिस्तानवर विजय मिळविता न आल्याने त्यासाठी आम्हाला जबाबदार धरले.

दहशतवादाविरोधात अमेरिकेने लढायला नको का? या प्रश्नावर इम्रान म्हणाले, अफगाणिस्तानच्या विषयात युद्ध हे समाधान होऊच शकत नाही. ओबामा प्रशासनाला 2008 मध्येच मी हे सांगितले होते, पण त्यांनी ऐकले नाही. अफगाण लोक बाहेरच्या सैन्याविरुद्ध संपूर्णपणे संघटित आहेत. पाकिस्तानात लाखो अफगाण शरणार्थी आहेत.

इम्रान म्हणाले की, तालिबाननेही हे स्वीकारलेले आहे की, ते संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवू शकत नाही. अफगाण सैन्यालाही हे शक्य नाही. अशा स्थितीत तडजोडीचीच भूमिका रास्त असू शकते. अन्यथा अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडू शकणार नाही.

पाकमध्ये पीएमवर लष्कर भारी

इम्रान खान यांनी कबूल केले, की पाकिस्तानात पंतप्रधानांपेक्षा लष्कराची शक्ती ही अधिक आहे. ओसामा बिन लादेन पाकमधील अबोटाबादेत आढळला आणि अमेरिकेकडून तिथेच मारला गेला. त्याचा काही तपास केला का पाक यंत्रणांनी, या प्रश्नावर इम्रान म्हणाले, आम्ही तपास केला. पण नाईन इलेव्हनपूर्वी पाक सैन्यच अल-कायदाला प्रशिक्षण देत होते. नंतर पाक सरकारने दहशतवादाविषयी बदललेल्या धोरणांबद्दल पाक सैन्यात असहमती होती. पाकमध्ये पंतप्रधानांपेक्षा सैन्य अधिक शक्तिशाली आहे काय, या प्रश्नावर इम्रान म्हणाले, की लोकशाही व्यवस्था ही नैतिक सत्तेच्या बळावर चालते. नेता जेव्हा नैतिक सत्ता गमावून बसतो, तेव्हा सैन्य आपल्या शक्तीनिशी त्याची जागा बळकावते.

Back to top button