ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग | पुढारी | पुढारी

ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग | पुढारी

वॉशिंग्टन डीसी ः 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध ‘इम्पीचमेंट’खाली  म्हणजेच महाअभियोगांतर्गत औपचारिक चौकशी (इम्पीचमेंट) सुरू करणार असल्याची घोषणा प्रतिनिधी गृहाच्या सभापती (स्पीकर) नॅन्सी पेलोसी यांनी केली आहे. त्यामुळे महासत्तेच्या राजकारणाला आगामी अध्यक्षीय निवडणुकीच्या तोंडावर कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. 

स्वतःच्या राजकीय लाभासाठी प्रतिस्पर्ध्याची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने परकीय देशातील सत्तेची मदत घेतल्याचा, त्यामुळे अधिकारावर येतानाच्या शपथेचा भंग केल्याचा, तसेच देशाच्या सुरक्षेबाबत विश्‍वासघात केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

ट्रम्प यांच्याविरोधात ‘इम्पीचमेंट’ची कारवाई करावी, अशी मागणी गेले काही महिने सातत्याने पुढे येत होती. पण त्याचे राजकीय परिणाम नेमके काय होतील, याविषयीच्या शंकेपोटी डेमॉक्रेटिक पक्ष त्याबाबत सावध पवित्रा घेत होता. या निर्णयामुळे अमेरिकेतील उभय राजकीय पक्षांतील वितुष्ट पराकोटीला जाण्याची शक्यता आहे.

एका जागरूक नागरिकाच्या (व्हिसल ब्लोेअर) तक्रारीच्या अनुषंगाने हे प्रकरण पुढे आले. युक्रेनच्या अध्यक्षांशी ट्रम्प यांनी जुलैमध्ये जे संभाषण केले, त्यात अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बायडेन व त्यांचे चिरंजीव हंटर बायडेन यांच्याविषयीच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी व तपास सुरू करावा, असे ते त्यांना वारंवार सांगत होते. इतकेच  नव्हे तर त्यासाठी दबाव आणत होते, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ व इतर अमेरिकन माध्यमाच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. युक्रेनला द्यावयाची 391 दशलक्ष डॉलर्सहून अधिक रकमेची मदत रोखून धरण्याचे आदेशही ट्रम्प यांनी त्यांच्या स्टाफला दिले आहेत.

अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी होत असून, ट्रम्प यांच्याविरोधात डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडेन हे त्यांचे प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात ही मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न असावा, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी गृह व सिनेटपैकी प्रतिनिधी गृहात डेमॉक्रेटिक पक्षाचे बहुमत (235) आहे. ‘इम्पीचमेंट’ चौकशीची घोषणा करताना नॅन्सी पेलोसी म्हणाल्या, “ट्रम्प यांच्या कृतीने घटनेतील तरतुदीचा भंग झाला आहे, हे गंभीर म्हटले पाहिजे. 

घटनेनुसार कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. अधिकारपदाची सूत्रे ग्रहण करताना घेतलेली शपथ तर त्यांनी मोडलेली आहेच. पण राष्ट्रीय सुरक्षिततेबाबत व निवडणुकीच्या पावित्र्याबाबतही त्यांनी विश्‍वासघात केला आहे.”

महाभियोगामुळे निवडणुकीत फायदा होईल ः  ट्रम्प 

राष्ट्राध्यक्षांचा मानसिक छळ करण्यासाठी डेमॉक्रेटिक पक्षाच्या वतीने आपल्याविरोधात महाभियोग दाखल करण्यात आल्याची टीका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. डेमॉक्रेटिक पक्षाच्या नेत्या आणि प्रतिनिधीगृहातील सभापती नॅन्सी पेलोसी यांनी ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची औपचारिक चौकशी सुरू केली आहे. यानंतर ट्रम्प यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. डेमॉक्रेटिक पक्षाच्या वतीने आपल्याविरोधात जादूटोणा केला जात आहे. राष्ट्राध्यक्षांना त्रास देण्यासाठीच त्यांनी महाभियोग चौकशीचा खटाटोप सुरू केला आहे. आपल्याला मात्र याचा आगामी निवडणुकीत लाभच होईल, असा दावाही त्यांनी व्यक्त केला. 

चौथ्या अध्यक्षांवरील बाका प्रसंग?

यापूर्वी युुद्धमंत्री एडविन एम स्टॅन्टन यांना पदावरून दूर केल्याप्रकरणी 1868 मध्ये त्यावेळचे अध्यक्ष अँड्रू जॉन्सन यांना प्रतिनिधीगृहाच्या ‘इम्पीचमेंट’ प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते; तर बिल क्‍लिंटन यांना 1998 मध्ये ‘व्हाईट हाऊस’मधील सहाय्यिकेच्या लैंगिक संबंधप्रकरणी शपथेवर खोटे बोलल्याच्या आरोपावरून या चौकशीशी सामना करावा लागला; पण सिनेटमध्ये दोन तृतीयांश मताअभावी या तत्कालीन दोन्ही अध्यक्षांना त्या आरोपातून मुक्‍त करण्यात आले. अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना 1974 मध्ये वॉटरगेट प्रकरणात या चौकशीला तोंड द्यावे लागले. आपल्याला पदावरून जावे लागणार, याची पूर्वकल्पना आल्याने ‘इम्पीचमेंट’ प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला.

Back to top button