अमेरिकेत 24 तासांत 18 हजार नवे रुग्ण | पुढारी

अमेरिकेत 24 तासांत 18 हजार नवे रुग्ण

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

अमेरिकेतील संक्रमितांचा आकडा आजअखेर एक लाखाच्या वर गेला आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत 18,691 नवे रुग्ण समोर आले आहेत. एका वृत्तसंस्थेच्या आकडेवारीनुसार दिवसभरात इथे 402  लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेने दिवसभरातील नव्या रुग्णसंख्येत इटली आणि चीनलाही मागे टाकले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2.2 ट्रिलियन डॉलर आपत्ती व्यवस्थापन निधी जाहीर केला असून, हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा निवारण निधी ठरला आहे.

जगातील 195 देशांतून शनिवारी सायंकाळपर्यंत कोरोना संक्रमितांची संख्या 6 लाख 17 हजार 288 वर गेली आहे. रात्री उशिरापर्यंत हा आकडा आणखी वाढणार आहे. जगात 28,377 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर यादरम्यान उपचाराअंती एक लाख 37 हजार 729 लोक बरे झाले आहेत. इटली, स्पेन, फ्रान्समध्ये हाहाकार सुरू असून, या तिन्ही देशांत मिळून 16,267 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये गेल्या 24 तासांत 832 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 24 तासांत 18 हजारांहून अधिक नवे रुग्ण समोर आले आहेत. 245 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेन सरकारने लष्कर तैनात केले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शनिवारी एक ट्विट केले आणि लोकांना घरीच राहण्याचे आवाहन केले. ब्रिटनमध्ये शनिवारी मृत्यूचा आकडा 1,019 ला भिडलेला आहे. शुक्रवारी तो 759 होता. पाकिस्तानातील रुग्णसंख्या आजअखेर 1,321 झाली असून, मृतांचा आकडा 11 वर गेला आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात शनिवारी नवे 448 रुग्ण आढळले. मुख्यमंत्री उस्मान बुजदर यांनी सांगितले की, सर्वाधिक 207 रुग्ण डेरा गाझी खान जिल्ह्यातील आहेत. बहुतांश रुग्ण हे इराणहून परतलेले नागरिक आहेत. खैबर पख्तुनख्वात 180, बलुचिस्तानात 133, व्याप्त गिलगिट-बाल्टिस्तानात 91, इस्लामाबादेत 27, व्याप्त काश्मीरमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत. 

इराणमध्ये 139 जणांचा मृत्यू

इराणमध्ये शनिवारी 139 नवे मृत्यू नोंदविले गेले. आजअखेर इथे 1,217 जणांचा मृत्यू झाला आहे. संक्रमणाची 35 हजारांहून अधिक प्रकरणे आहेत.

अमेरिकेची भारताला 21 कोटींची मदत

  अमेरिकेने कोरोना विषाणू प्रभावित 64 देशांना 174 दशलक्ष डॉलर मदत जाहीर केली आहे. भारताला 2.9 दशलक्ष डॉलर (21.7 कोटी) मिळतील.

Back to top button