इटली दु:खसागरात बुडाली; कोरोनाने घेतला ११ हजार लोकांचा बळी  | पुढारी

इटली दु:खसागरात बुडाली; कोरोनाने घेतला ११ हजार लोकांचा बळी 

मिलान (इटली) : पुढारी ऑनलाईन

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे इटली दु:खसागरात बुडाली आहे. कोरोनामुळे येथील मृतांचा एकूण आकडा ११ हजार ५०० वर पोहोचला आहे. आतापर्यंत १ लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर सुमारे चार हजार लोक मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत. या रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली आहे.

कोरोनामुळे मृतांचा आकडा मोठ्या संख्येने वाढत असल्याने येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर इटली सरकारने लॉकडाऊन १२ एप्रिलपर्यंत वाढविले आहे. तीन आठवड्यापर्यंत चाललेले लॉकडाऊन देशासाठी आथिकदृष्ट्या खूप कठीण आहे, असे इटलीचे पंतप्रधान ग्यूसेपी काँटे यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊन अधिक दिवस पुढे नेले जाऊ शकत नाही. आम्ही काही प्रमाणात प्रतिबंध हटविण्याचे पर्याय शोधत आहोत. प्रतिबंध हळूहळू हटविले जातील, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, स्पेनमध्येही कोरोनाने हाहाकार सुरुच आहे. सोमवारी, स्पेनमध्ये ९१३ जणांचा मृत्यू झाला. येथील मृतांचा एकूण आकडा आठ हजारांवर पोहोचला आहे. कोरोनामुळे येथील साडेपाच हजार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३,१७३ जणांचा बळी घेतला आहे. तर तब्बल १ लाख ६४ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

Back to top button