एक कोटी रुपये दंडापासून ते फाशीच्या शिक्षेपर्यंतचे भय  | पुढारी

एक कोटी रुपये दंडापासून ते फाशीच्या शिक्षेपर्यंतचे भय 

कोल्हापूर : पुढारी डेस्क

2 मार्च रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह आढळला. नंतर बरेच दिवस शांतता होती. महिन्यातील शेवटचा आठवडा मात्र सौदी अरबियासाठी वाईट बातमीचा ठरला. सौदी बिनलादिन या कन्स्ट्रक्शन कंपनीतील 5 कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. नंतर तातडीने 8,000 कामगारांना क्‍वारंटाईन करण्यात आले. मशिदीच्या विस्तारीकरणाच्या बांधकामासाठी हे सगळे मजूर खास नेमलेले होते. अर्थात मशिदीचे कामही तातडीने थांबविण्यात आले. 14 एप्रिलपर्यंत सौदीत कोरोना सर्वव्यापी झालेला होता. मजूर ते महाराजा असे वर्तुळ या विषाणूने पूर्ण केले होते. पुढे 3 कोटी लोकसंख्येच्या या देशात कोरोनाने असा जम बसविलेला होता. आखातातील सर्व 6 देशांमध्ये सौदीची रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली. इराणमध्ये तीर्थयात्रेला गेलेल्या शियापंथीयांनी सौदीत परतताना आपल्या सोबत कोरोनाची बला आणली, अशीच थेअरी सौदीमध्ये मांडली जाते… 

बघता बघता 8 एप्रिलपर्यंत सौदीतील सत्ताधारी शाही परिवारातील 150 जणांना कोरोनाची लागण झाली होती. किंग सलमान यांच्यासह त्यांचे उत्तराधिकारी राजपुत्र (क्राऊन प्रिन्स) मुहम्मद बिन सलमान यांनाही आयसोलेट व्हावे लागले. प्रिन्सने आपल्या मर्जीतील अधिकार्‍यांना सोबत घेतले आणि ते निघून गेले ‘नेओम’ नावाच्या अद्याप आकाराला न आलेल्या शहराकडे. अर्थात नेओम नावाने एका नव्या शहराच्या उभारणीचे वचन प्रिन्स यांनी दिले होते. ते साकारण्यासाठीच्या पूर्वतयारीत त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले. 

24 मार्च रोजी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कर्फ्यू लागू केल्यानंतरही मक्‍का आणि रियाधमधल्या झोपडपट्ट्यांमुळे कोरोना या शहरांतून फोफावतच राहिला. दोन लाख लोकसंख्येच्या मक्‍का शहरातील रुग्णसंख्या 12 एप्रिलपर्यंत 1050 पर्यंत पोहोचली होती. राजधानी रियाधमध्ये 1422 जण पॉझिटिव्ह आढळले होते. रियाधची लोकसंख्या मक्केच्या तीनपट आहे. देशातील रुग्णसंख्या 5 हजारांवर गेली. दरम्यान, 7 एप्रिल रोजी सौदीचे आरोग्यमंत्री तौफीक अल राबिया यांनी, देशातील रुग्णांची संख्या येत्या काही आठवड्यानत 2 लाखांपर्यंत पोहोचेल, अशी भविष्यवाणी करून देशात एकच घबराट उडवून दिली होती. या तारखेपर्यंत 2,795 रुग्णसंख्या होती. पुढे अचानक दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली. दररोज 300 नवे रुग्ण समोर येऊ लागले. आरोग्यमंत्र्यांची भविष्यवाणी खरी ठरते की काय, असे चित्र उभे राहिले. पण नंतर सुदैवाने परिस्थिती निवळत गेली. अर्थात आरोग्यमंत्र्यांचा अंदाज खोटा ठरला. आजअखेर सौदीतील एकूण बाधितांची संख्या 20 हजारांच्या जवळपास स्थिरावली आहे. नव्याने आढळणार्‍या रुग्णांचे प्रमाणही आटोक्यात आले आहे. अखेर लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय किंग सलमान यांनी जाहीर केला. पण, अद्यापही सोशल डिस्टन्सिंगचे पालन लोकांवर बंधनकारक आहे. माहिती दडविल्यास 1 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूदही कायम ठेवण्यात आली आहे… आणि हो… दरम्यानच्या काळात सौदीत घडलेला एक किस्सा सौदीच्या सीमा ओलांडून जगभरात गाजला. सौदीतील रियाधमध्ये एक कोरोनाबाधित सार्वजनिक ठिकाणी थुंकला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला फाशीची शिक्षा देण्यापर्यंतची चर्चा सौदीत झाली. सुदैवाने अद्याप तसे घडलेले नाही, पण कोरोनाविरुद्ध सौदी सरकार किती कठोर होऊ शकते, याचा संदेश लोकांपर्यंत गेला आणि कोरोनाच्या अटकावात त्याचीही मदत झालीच!

न थी मेरी किस्मत कि देखू मदिना…

तिथे आकाशात ईदच्या चंद्राचा दिदार (दर्शन) झाला आणि इथे सौदीचे किंग सलमान यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले! रमजानचा पवित्र महिना आहे आणि या पाक माह-ए-रमजानमध्ये नमाजींसाठी व्याकुळलेल्या मशिदी पाहून मला किती दु:ख होते आहे, ते मी सांगू शकत नाही. अल्लाहचे घर असे सुने सुने पाहवत नाही. पण, ‘सब्र’ ठेवा… कोरोना आदमच्या लेकरांचा इम्तेहान घेत आहे… अल्लाह के फझल से हेही दिवस जातील निघून, अशा भावगर्भ भावना या बादशहाने रमजानच्या पूर्वसंध्येला व्यक्‍त केल्या होत्या. 

तत्पूर्वी 1 एप्रिल रोजी अत्यंत जड अंत:करणाने जगभरातील मुस्लिमांना उद्देशून कुणीही हजसाठी बुकिंग करण्याची घाई करू नये म्हणून सौदीकडून आवाहन करण्यात आले होते. सौदीचे हज मंत्री मुहम्मद सालेह बंतेन यांचा आवाज हे आवाहन करताना जड झालेला होता. यंदा जुलै आणि ऑगस्टमध्ये मक्‍का आणि मदिनेत जगभरातून 20 लाख भाविक पोहोचणार होते… पण हज काय आणि उमरा काय, कोरोनाने सगळ्यांवर पाणी फिरविले आहे. एक एप्रिलपर्यंत 1720 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. 16 जण मरण पावले होते.

सौदीच्या कडक उपाययोजना

23 मार्चपासून कर्फ्यू लागू करण्यात आला.  27 मार्चला 13 प्रांतांतून येणे-जाणे बंद झाले. सर्व प्रकारच्या प्रवासावर निर्बंध लादण्यात आले.  विमाने, रेल्वे, बस सगळे बंद करण्यात आले. मक्‍का-मदिनासह सर्वच पवित्र स्थळांच्या तीर्थयात्रांवर बंदी. 

 सौदीत मार्चमध्येच सर्व मशिदी बंद करण्यात आल्या होत्या.  आजार लपविणे, प्रवासाबद्दलची माहिती न देणे गुन्हा ठरले.

 तसे केल्यास 1 कोटी रुपये दंडाची तरतूद करण्यात आली.  पूर्वेतील कातिफ 8 मार्च रोजीच लॉकडाऊन केले होते.

सौदी कोरोना टुडे

 नजीकच्या काळात 3110 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह होते. पैकी 2953 जण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे.

 सौदीत आजअखेर 157 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 5 टक्के आहे. आजअखेर एकूण संक्रमित 21,402.

 

Back to top button