व्हाईट हाऊस म्हणते, ‘म्हणून’ पीएम मोदींना ट्विटरवर अनफॉलो केलं! | पुढारी

व्हाईट हाऊस म्हणते, 'म्हणून' पीएम मोदींना ट्विटरवर अनफॉलो केलं!

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हाईट हाऊसने ट्विटरवर अनफॉलो केल्यानंतर अनेक चर्चांना तोंड फुटले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनफॉलो का केलं? याचा खुलासा केला आहे.  व्हाईट हाऊसने खुलासा करताना म्हटले आहे की, आपल्या राष्ट्राध्यक्षांचा द्विपक्षीय दौरा असताना संबंधित देशातील अधिकाऱ्यांची ट्विटर हँडल फॉलो केली जातात. जेणेकरून त्या दौऱ्याला पाठिंबा देण्यासाठी देण्यात आलेला संदेश रिट्विट करून देता यावा हा त्यामागील उद्देश असतो. 

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात भारताचा द्विपक्षीय दौरा केला होता. त्यानंतर व्हाईट हाऊसच्या @WhiteHouse या अधिकृत  ट्विटर हँडलवरून पीएम मोदी यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पीएमओ ऑफिस, अमेरिकेतील भारतीय दुतावास, अमेरिकेचे भारतातील दुतावास त्याचबरोबर भारतातील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांना फॉलो करायला सुरुवात केली होती. 

तथापि आता वरील सर्व ट्विटर हँडल व्हाईट हाऊसकडून अनफॉलो करण्यात आली आहेत. व्हाईट हाऊसकडून अमेरिकन सरकारमधील वरिष्ठांची तसेच इतर काही उचित लोकांची ट्विटर हँडल फॉलो केली जातात. तसेच राष्ट्राध्यक्षांच्या द्विपक्षीय दौऱ्यावेळी काही कालावधीसाठी ट्विटर हँडल फॉलो केली जातात, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. 

Back to top button