कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला प्राणी ठरणार कारणीभूत! | पुढारी

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला प्राणी ठरणार कारणीभूत!

लंडन : वृत्तसंस्था

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यात मानवाला यश आले, तरी प्राण्यांमार्फत या विषाणूच्या संक्रमणाचा धोका कायम आहे. या महामारीच्या दुसर्‍या लाटेला प्राणीच कारणीभूत ठरतील, असा दावा युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या शोध अहवालात करण्यात आहे. 

या शोधाची माहिती लेंसेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. मानवामार्फत पाळीव प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि अशा घटनांमध्ये वाढ झाली, तर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. संक्रमित प्राण्यांकडून मानवाला संसर्ग होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. नेमका कोणत्या प्राण्याकडून सर्वात अधिक धोका आहे, याचा शोध घेणे महत्त्वाचे असल्याचे या संशोधनात सहभागी असलेल्या प्राध्यापिका जॉन सेंटिनी यांनी सांगितले. 

प्राण्यांमध्ये हा विषाणू फोफावला, तर 2002 मधील महामारीच्या तुलनेत भयानक स्थिती निर्माण होईल. या विषाणूचे मॉडेल व लॅब स्टडीद्वारे समोर आलेल्या माहितीवरून विविध प्राणी या विषाणूची शिकार होऊ शकतात, असेही सेंटिनी म्हणाल्या. प्राण्यांमध्ये हा विषाणू पोहोचल्यावर साहजिकच एका प्रजातीकडून दुसर्‍या प्रजातीला संसर्गाचा धोका आहे.  

मानवाद्वारे प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो आणि अशा संक्रमित प्राण्यांकडूनही मानवाला पुन्हा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे;  मात्र या संक्रमणाचा नेमका धोका किती, यावर आणखी संशोधनाची गरज आहे.

– जॉन सेंटिनी, प्राध्यापिका,

 युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन

प्राण्यांना संसर्गाची प्रकरणे

    5 मार्चला हाँगकाँगमध्ये दोन पाळीव श्वानांना मानवामार्फत कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, त्यांच्या शरीरात अँटीबॉडीही तयार झाली होती. 

    5 एप्रिल रोजी न्यूयॉर्कमधील एका प्राणी संग्रहालयात चार वर्षांची वाघीण पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर 22 एप्रिलला चार वाघ आणि 3 सिंहांनाही लागण झाल्याचे समोर आले होते. 

    22 एप्रिलला न्यूयॉर्कमधील दोन मांजरांना संसर्ग झाल्याचे आढळले. त्यांना श्वास घ्यायला अडथळा येत होता. 

    नेदरलँडमध्ये मिंक या प्राण्याद्वारे मानवाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उदाहरणही नुकतेच समोर आले आहे. 

Back to top button