अमेरिकेचा चीनला जोरदार दणका; ट्रम्प यांनी हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर केली स्वाक्षरी  | पुढारी

अमेरिकेचा चीनला जोरदार दणका; ट्रम्प यांनी हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर केली स्वाक्षरी 

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिका आणि चीन यांच्यातील मतभेद आता तीव्र होताना दिसत आहे. अमेरिकेने चीन विरोधात मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांनी चीन विरोधात कडक बंदी घालणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. त्याचसोबतच हाँगकाँगसोबतचा व्यापार दर्जा काढून घेतला आहे. हाँगकाँगमधील त्रासदायक कारवाया आणि अत्याचारासाठी चीनला अमेरिकेने दोषी ठरवले आहे. नव्या कायद्यामुळे चीनला त्यांच्या दुष्कर्मांसाठी जबाबदार ठरवण्यासाठी बळ मिळणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

वाचा : गलवानमध्ये मारल्या गेलेल्या चिनी सैनिकांवर गुपचुप अंत्यसंस्कारासाठी दबाव?

ट्रम्प यांनी व्हाईट हाउसमध्ये मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, हाँगकाँगमध्ये जे काही चालले आहे ते आम्ही पहात आहोत. अशा परिस्थितीत त्यांची स्वायत्तता संपवणे ठीक नाही. आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव अनेक देशांना पटवून द्यावे लागले की हुवावे धोकादायक आहे. आता ब्रिटनने देखील हुवावेवर बंदी घातली आहे.

हाँगकाँगमध्ये जे काही चालले ते आम्ही पाहिले. त्यांची स्वायत्तता काढून घेण्यात आली जेणेकरुन ते खुल्या बाजारात स्पर्धा करु शकणार नाहीत. मला वाटते की बहुतांश लोक हाँगकाँग सोडणार आहेत. आता हाँगकाँगला कोणतीही स्पेशल ट्रिटमेंट दिली जाणार नाही. हाँगकाँगला चीन सारखीच वागणूक दिली जाईल. चीनने अमेरिकेचा फायदा उठवला आणि बदल्यात व्हायरस दिला. परिणामी अमेरिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले, अशा शब्दांत ट्रम्प यांनी चीनवर निशाणा साधला आहे.

वाचा : भारतात मानवावरील कोव्हॅक्सिन चाचणी प्रक्रिया सुरू

विकसनशील देशाच्या नावावर चीन सतत अमेरिकेचा फायदा घेत राहिला.  मागील सरकारने त्यांना मदत केली. मात्र, आमच्या सरकारने चीन विरोधात कडक पावले उचलली. चीनमुळेच जगाला आज मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेवरदेखील त्यांनी टिका केली आहे. ही संघटना चीनच्या हातातले बाहुले बनले आहे. संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा फैलाव होण्यासाठी चीन जबाबदार आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

वाचा : राजस्थान काॅंग्रेसमध्ये फूट; भाजपने पायलट यांना दिली ‘ही’ ऑफर

Back to top button