दक्षिण चीन समुद्रात ड्रॅगनने डागले ‘किलर’ मिसाईल | पुढारी

दक्षिण चीन समुद्रात ड्रॅगनने डागले ‘किलर’ मिसाईल

बीजिंग : वृत्तसंस्था

दक्षिण चीन समुद्र आता आंतरराष्ट्रीय वादाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. चीनने दक्षिण चीन समुद्रात दोन ‘किलर’ क्षेपणास्त्रे डागली असून, अमेरिकेला डिवचण्याचा प्रयत्न यातून केला आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले असून, ही डागणी चीनच्या युद्धसरावाचा एक भाग असल्याची सारवासारव या वृत्तातून करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या दोन टेहळणी विमानांनी चीनच्या हद्दीत घुसून चिनी सैन्य तळावरील हालचाली टिपल्या होत्या. अमेरिकेच्या या कृतीवर चीनने तीव्र हरकत घेतली होती. अमेरिकेने दोन दिवसांपूर्वीच ही कृती केली होती. तत्पूर्वी, चालू महिन्यातच अमरिकेच्या लढाऊ विमानांनी शांघायपासून 75 कि.मी. अंतरावर घिरट्या घातल्या होत्या. चीनला इशारा देणार्‍या अमेरिकेच्या या कारवायांना आता चीनने क्षेपणास्त्र डागणीतून प्रत्युत्तर दिले आहे.

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’मधील वृत्तानुसार, बुधवारी दोन घातक क्षेपणास्त्रे हॅनॉन आणि पार्सेल बेटांदरम्यान समुद्रात डागण्यात आली. मध्यम पल्ल्याची ही क्षेपणास्त्रे युद्धनौकांचा अचूक वेध घेण्यात सक्षम आहेत. क्षेपणास्त्र डागणीदरम्यान या भागातील हवाई वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. याच भागात काही दिवसांपूर्वी अमेरिकन युद्धनौका ‘रोनाल्ड रीगन’ने पार्सेल बेटाजवळ युद्धसराव केला होता. अमेरिकन टेहळणी विमानांकडून झालेल्या घुसखोरीसह या युद्धसरावाचा अर्थही चीनकडून ‘अमेरिकेचे आव्हान’ असाच घेण्यात आला होता. क्षेपणास्त्र डागणीतून आता चीनने अमेरिकेला प्रतिआव्हान दिले आहे. चीनने एक क्षेपणास्त्र क्विंघाई प्रांतातून, तर दुसरे शांघायच्या दक्षिणेकडील झेजियांग प्रांतातून डागले.

दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त भागात सध्या चीन आणि अमेरिका हे दोन्ही देश आपापल्या सैन्याची ताकद वाढवू लागले आहेत. अवघा दक्षिण चीन समुद्र चीनच्या मालकीचा असल्याचा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा दावा आहे. दक्षिण चीन समुद्र परिसरातील देशांना तसेच अमेरिकेलाही हा दावा अमान्य आहे. या वादग्रस्त क्षेत्रात आता अमेरिका आपली ताकद वाढवत असल्याने दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढला आहे. तथापि, चीनने आपल्या लढाऊ विमानांच्या पायलटांना आणि नौसेनेला अमेरिकेच्या 

युद्धनौका आणि लढाऊ विमानांचे दळणवळण न रोखण्याचे आदेश दिले आहेत. पहिली गोळी आमच्याकडून झाडली जाणार नाही, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयानेही स्पष्ट केले आहे. अमेरिकेत सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशात अमेरिकेमध्ये चीनविरोधी वातावरण अधिक तीव्र होऊन त्याचा फायदा डोनाल्ड ट्रम्प यांना मिळू शकतो. तसे घडू नये हा चीनच्या या भूमिकेमागचा उद्देश आहे, असे मानले जाते.

Back to top button