सिंधू संस्कृतीचा उदयास्त वातावरण बदलामुळे? | पुढारी

सिंधू संस्कृतीचा उदयास्त वातावरण बदलामुळे?

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

प्राचीन सिंधू किंवा हडप्पा संस्कृतीचा उदय आणि र्‍हास होण्याची अनेक कारणे आतापर्यंत सांगितली गेली आहेत, परंतु अमेरिकेतील रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या अभ्यासात वातावरणातील बदल हेदेखील एक कारण उजेडात आले आहे. 

निशांत मलिक या भारतीय मूळ असलेल्या शास्त्रज्ञाने हे संशोधन केले आहे, हे विशेष. मलिक यांनी उत्तर भारतातील गेल्या 5,700 वर्षांच्या पर्जन्यमानाचा अभ्यास केला. या अभ्यासासाठी त्यांनी अत्याधुनिक गणितीय पद्धत अवलंबिली. त्यांचे हे संशोधन ‘केऑस’ या विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे. या अभ्यासासाठी त्यांनी दक्षिण आशियातील गुहांच्या तळाला साचलेल्या शंकुच्या आकाराच्या चुनखडीच्या थरांचा अभ्यास केला. त्यातून त्यांना 5,700 वर्षांपासूनच्या पर्जन्यमानाचा अंदाज काढता आला. 

इंदू संस्कृती भटक्या आर्यांच्या आक्रमणामुळे लयास गेली, असा एक प्रवाद आहे, तर भूकंपामुळे ती नष्ट झाली असेही मानले जाते. मात्र, ताज्या संशोधनातून वातावरण बदल हेच यामागील मुख्य कारण असावे, असा निष्कर्ष निघाला आहे. निशांत मलिक म्हणाले, या अभ्यासासाठी आपण जे गणितीय सूत्र वापरले आहे, त्यामुळे अनेक प्राचीन संस्कृती, वास्तूंच्या र्‍हासाची कारणे लक्षात येण्यास मदत होईल.

इंदू संस्कृतीच्या र्‍हासापूर्वी मान्सूनचा आकृतिबंध झपाट्याने बदलत गेला असावा. म्हणजेच इंदू नदीच्या खोर्‍यातील पर्जन्यमान वेगाने घटत गेले असावे. त्यामुळे ही संस्कृतीच नामशेष झाली असावी, असे या संशोधनाच्या विश्लेषणात म्हटले आहे. 

सिंधू संस्कृती म्हणजे काय?

सिंधू संस्कृती इ.स. पूर्व 3300 ते 1700 या काळात अस्तित्त्वात आली आणि लोप पावली. ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हणूनही तिला ओळखले जाते. या संस्कृतीला भारतीय संस्कृतीचे मूळ मानले जाते. त्यानंतर सातव्या शतकात पंजाबमध्ये काही लोकांनी घरे बांधण्यासाठी खोदकाम केले तेव्हा त्यांना मातीच्या पक्क्या विटा सापडल्या. त्याला दैवी चमत्कार मानून त्यांनी त्याच विटांची घरे बांधली 1836 मध्ये चार्ल्स मेसनने या प्राचीन संस्कृतीचा शोध लावला. मात्र, 1921 मध्ये दयाराम सहानी यांनीच सिंधू संस्कृतीच्या अस्तित्त्वाचे पुरावे उजेडात आणले, असे मानले जाते. त्याच वर्षी पंजाबमधील हडप्पा येथे प्रायोगिक संशोधन झाले. त्यानंतर 1922 मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदडोचा शोध लावला. 

Back to top button