फ्रान्स : चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय | पुढारी

फ्रान्स : चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

पॅरिस : पुढारी ऑनलाईन 

फ्रान्समध्ये १५ दिवसांत दुसर्‍यांदा भयभीत करणारा दहशतवादी हल्ला झाला आहे. नीस शहरात दहशतवाद्याने एका महिलेचे शिर धडावेगळे केले. याच दहशतवाद्याने चर्च परिसरात २ जणांची चाकूने भोसकून हत्या केली. नीसच्या महापौर क्रिस्टियन अ‍ॅट्रोसी यांनी सांगितले की, हल्ल्याच्या घटनेनंतर गुरुवारी सकाळीच आरोपीला अटक करण्यात आली आहे. हल्लेखोराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारण, अटकेच्या कारवाईदरम्यान तो जखमी झाला होता. हल्ल्याचा तपास करत असलेल्या फ्रान्सच्या अँटी-टेररिझम एजन्सीकडून (दहशतवादविरोधी यंत्रणा) सांगण्यात आले की, हल्ल्यात एकच दहशतवादी सहभागी असून, या प्रकरणात आम्ही आणखी इतर कुणाच्याही शोधात नाही.

‘अल्लाह हू अकबर’चा घोष

नीसच्या महापौर क्रिस्टियन अ‍ॅट्रोसी म्हणाल्या की, हल्लेखोर अटकेनंतर ‘अल्लाह-हू-अकबर’चा जयघोष करत होता. त्याच्या या घोषणांनंतर हल्ल्यामागचा त्याचा हेतू काय होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अर्थात, या घटनेचा संबंध चार्ली हेब्दोच्या अंकात प्रेषित मोहम्मद यांची व्यंगचित्रे प्रकाशित करण्याच्या घटनेशी आहे किंवा कसे, ते अद्याप समोर आलेले नाही. चर्चमध्ये खून झालेली व्यक्‍ती वॉर्डन असल्याचे सांगण्यात येते.

इतिहासाच्या शिक्षकाची हत्या

काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा मुद्दा शिकवत असताना चार्ली हेब्दोत छापून आलेले प्रेषितांचे व्यंगचित्र विद्यार्थ्यांना दाखविल्याचा राग येऊन चेेचेन्यातील एका कट्टरपंथी 18 वर्षीय विद्यार्थ्याने या शिक्षकाचा गळा चिरला होता. यानंतर फ्रान्स सरकारने मूलतत्त्ववादी इस्लामिक संघटनांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली.

आपत्कालीन बैठक

गुरुवारच्या घटनेनंतर फ्रान्स सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली. पंतप्रधान जीन कास्टेक्स म्हणाले, दहशतवाद हे आमच्या देशासमोर आव्हान म्हणून उभे ठाकले आहे. कडक निर्णय घ्यावेच लागतील. 

Back to top button