वोल्दिमीर झेलेन्स्की: ‘नाटो’ने अंग काढले; ‘नो फ्लाय झोन’ जाहीर करण्यास नकार | पुढारी

वोल्दिमीर झेलेन्स्की: ‘नाटो’ने अंग काढले; ‘नो फ्लाय झोन’ जाहीर करण्यास नकार

कीव्ह/मास्को ; वृत्तसंस्था : युक्रेनला ‘नो फ्लाय झोन’ जाहीर करण्यात यावे, अशी युक्रेनचे राष्ट्रपती वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी ‘नाटो’कडे केलेली मागणी ‘नाटो’ने फेटाळून लावल्यानंतर संतापलेल्या झेलेन्स्की यांनी ‘नाटो’वर टीकास्त्र सोडले आहे. ‘रशिया युक्रेनची शहरे आणि गावांवर नव्याने हल्ले करणार, हे माहीत असतानासुद्धा ‘नाटो’ने युक्रेनच्या आकाशातून उडणार्‍या रशियन विमानांसाठी ‘नो फ्लाय झोन’ जाहीर केले नाही आणि एकप्रकारे युक्रेनमधील शहरे आणि गावांवर बॉम्ब वर्षाव करण्यास हिरवा झेंडा दाखवला,’ अशा शब्दांत झेलेन्स्की यांनी ‘नाटो’वर तोंडसुख घेतले आहे.

युक्रेनच्या आभाळात कुठल्याही विमानास, हेलिकॉप्टर अगर ड्रोनच्या उड्डाणाला ‘नाटो’ने बंदी घालावी, असे युक्रेनला अपेक्षित होते. अधिकार कक्षेचा मुद्दा उपस्थित करून नाटो सदस्य देशांतील परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ती फेटाळून लावण्यात आली. युक्रेनवर ‘नो फ्लाय झोन’ जाहीर केल्यास आतापर्यंत युक्रेनपुरते मर्यादित असलेले हे युद्ध आणखी बाहेर पसरेल, अशी भीती ‘नाटो’ने व्यक्‍त केली आहे. तर दुसरीकडे युक्रेनचे आकाश बाहेरच्या विमानांना बंद करा, असा घोषा निर्वासितांनी चालवला आहे.

अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर पडता यावे म्हणून शनिवारी रशियन लष्कराने मारियुपोल आणि ओलनोवखा या दोन प्रदेशांत तात्पुरती युद्धबंदी घोषित केली. युक्रेनच्या लष्कराशी चर्चा करूनच सकाळी 10 ते रात्री 8 या काळापुरती ही युद्धबंदी राहील, असे रशियन संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेे.

मात्र, युद्धबंदीत सुटकेचे हे मार्ग किती काळ खुले राहतील याचा कोणताही उल्‍लेख रशियाच्या निवेदनात नव्हता. त्यानंतर नागरिक बाहेर पडताच रशियाचे हल्‍ले सुरूच राहिले. रशिया घोषित युद्धबंदी पाळत नसून नागरिकांनी तत्काळ बंकरमध्ये परतावे, असे आवाहन युक्रेन सरकारने केले. त्यामुळे ही युद्धबंदी नावापुरतीच शिल्लक उरली आणि ठिकठिकाणी नागरिक अडकून पडले.

या कथित युद्धबंदीचा तडाखा रशियाच्या हल्ल्याचे नवे केंद्र असलेल्या समी शहरातील भारतीय विद्यार्थ्यांना बसेल. समीपासून 600 किलोमीटरवर असलेल्या मारियुपोलमधून भारतीय विद्यार्थी अखेर बाहेर पडले. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून बाहेर पडलो असून, सीमेकडे जात आहोत. आमचे काही बरेवाईट झाल्यास त्याला सरकार आणि भारतीय दूतावास जबाबदार राहील. शिवाय ‘ऑपरेशन गंगा’चे हे मोठे अपयश असेल, असे बजावणारा व्हिडीओ समी विद्यापीठाच्या भारतीय विद्यार्थ्यांनी जारी केला.

युक्रेन सोडून बाहेर पडणार्‍या नागरिकांना सतत धोका आहे तो रशियन लढाऊ विमानांचा. आतापर्यंत 10 लाख नागरिकांनी युक्रेन सोडले. युक्रेनच्या अवकाशात ‘नो फ्लाय झोन’ जाहीर करा, अशी मागणी या नागरिकांनी नाटोकडे सतत चालवली आहे. मात्र, युक्रेनवर अशी विमानबंदी घोषित करण्याचा अधिकार असूनही नाटोने तसा निर्णय घेण्यास नकार दिला आहे.

* युक्रेनचे लढवय्ये अध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी ‘नो फ्लाय झोन’च्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यासोबतच ‘नाटो’ला निर्वाणीचा इशारा देत झेलेन्स्की यांनी बजावले की, आम्ही वारंवार सांगूनही नाटो युक्रेनवर ‘नो फ्लाय झोन’ जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहे. या युद्धात इथून पुढे रोज आमचे जे नागरिक मृत्युमुखी पडतील त्यास केवळ आणि केवळ नाटो जबाबदार असेल.

Back to top button