युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण | पुढारी

युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

करण प्रदीप पाटील चेर्निवत्सी, युक्रेन बॉर्डरवरून

युद्धग्रस्त युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी खुल्या झालेल्या तीनपैकी एक सरहद्द बंद झाली आणि युक्रेनच्या रोमानिया सरहद्दीवर भारतीय विद्यार्थ्यांची प्रचंड झुंबड उडाली. बसायला जागा नाही, टॉयलेटची सोय नाही, रात्री उणे 6 वर तापमान घसरलेले… अशा अवस्थेत 2500 विद्यार्थी आपल्याला रोमानियात कधी प्रवेश मिळतो आणि भारताचे विमान पकडतो या प्रतीक्षेत रविवारी दिवसभर होते. या दरम्यान सरहद्दीचे गेट खुले होताच प्रत्येक जण रोमानियाच्या दिशेने घुसण्याचा प्रयत्न करू लागला आणि युक्रेनच्या जवानांनी भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. मुलींच्या कानशिलात भडकावली. त्यांचे केस पकडून त्यांना मागे ढकलले आणि एका विद्यार्थ्याला तर खाली पाडून बुटांनी तुडवले.

युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच असून कुठे, कधी स्फोट होईल याचा भरवसा राहिलेला नाही. भारतीय विद्यार्थीच नव्हे तर युक्रेनचे नागरिकही लाखोंच्या संख्येने देश सोडू लागले आहेत. युक्रेनच्या बाहेर पडण्यास तीनच मार्ग आहेत. हंगेरी, रोमानिया आणि पोलंड. यापैकी युद्धग्रस्त स्थलांतरित युक्रेनियन नागरिकांची अलोट गर्दी उसळल्याने पोलंडची सरहद्द अक्षरश: तुंबली आणि बंद पडली. याच सरहद्दीवर गेलेले सहा हजार भारतीय विद्यार्थी परत फिरले. ते आता युक्रेनच्या रोमानिया सरहद्दीवरील चेर्निवत्सीकडे निघाले आहेत. इथे आधीच अडीच हजार विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. ही आणखी भर पडल्यास येथील विद्यार्थी संख्या 8 हजारांवर जाईल. या सर्वांच्या पुढे कोणते हाल वाढून ठेवलेले आहेत याची कल्पनाही करवत नाही.

चेर्निवत्सी चौकीजवळ हळूहळू अडीच हजारांवर विद्यार्थी जमले. इथे टॉयलेट नाहीत, बाथरूम नाही, राहण्याची सोय नाही, तिथे एक पेट्रोल पंप आहे. त्यांचा एक कॅफे आहे आणि बाजूला एक रेस्टॉरंट आहे. सुरुवातीला या दोन्ही ठिकाणचे टॉयलेट आम्ही वापरले. विद्यार्थी संख्या वाढली आणि दोन्हीकडे भारतीयांना प्रवेश नाही, असे बोर्ड लागले. नाही म्हणायला युक्रेन सरकारने खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. म्हणजे ब्रेड, टोमॅटो, उकडलेले बटाटे असे ते देतात. मात्र, झोपण्याची सोय नाही. रात्री तापमान उणे 6 डिग्री सेल्सिअसखाली जाते. या कडाक्याच्या थंडीत आणि घाणेरड्या व्यवस्थेत सर्वात जास्त हाल होत आहेत ते मुलींचे.

आमच्यासोबत आमच्या विद्यापीठाचे एजंट आहेत. ते आमच्यापुरते बघतात. तसे सगळ्याच विद्यापीठांचे एजंट इथे असले तरी मूळ प्रश्न न सुटणार्‍या सीमाप्रश्नासारखा आहे. इथल्या युक्रेनच्या पोस्टवरून रोमानियामध्ये अत्यंत मर्यादित संख्येने विद्यार्थी सोडले जाताहेत. बाकीच्यांना युक्रेनच्या हद्दीत गेटवरच थांबावे लागते. म्हणजे युक्रेनच्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर नो मेन्स लँड लागते. ती पार करून रोमानियाच्या हद्दीत प्रवेश मिळतो. तिथून हॉटेल्स किंवा विमानतळापर्यंत जाण्यासाठी फक्त 4 बसेस आहेत. दोन जातात, दोन येतात. रविवारी संध्याकाळपर्यंत विमानांची संख्याही दोनच्या पुढे गेलेली नव्हती. आता चार विमानांची सोय झाल्याचे समजते. मात्र, आमची युक्रेनमधून सुटका करण्याची हीच गती असेल तर आम्हाला घरी पोहोचण्यासाठी किमान दोन आठवडे लागू शकतात.

दोन दिवसांपासून युक्रेनच्या रोमानिया सरहद्दीवर इतक्या प्रचंड संख्येने भारतीय विद्यार्थी उघड्यावर असताना युक्रेनमधील भारतीय दूतावासाचा कुणीही कर्मचारी फिरकला नाही. रोमानियात हॉटेल्स, जेवण आणि विमान प्रवास अशी सारी चोख व्यवस्था असली तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी युक्रेनच्या गेटमधून बाहेर पडावे लागेल आणि हे गेट सतत बंद आहे. टप्प्याटप्प्याने काही विद्यार्थ्यांना सोडले जाते. रविवारी एकदा असेच गेट उघडले आणि संयम सुटलेले विद्यार्थी गेटकडे धावले. मुलांची अवस्था जराही समजून न घेता युक्रेनच्या जवानांनी मुंड्या पकडून या विद्यार्थ्यांना मागे फेकले. एकाला पायाने तुडवले. एका मुलीचे केस धरून तिला झटकले. एकीच्या कानशिलात लगावली. हा सारा अत्याचार सहन करण्याशिवाय आम्हा विद्यार्थ्यांसमोर अन्य पर्याय नव्हता.

युक्रेनमधील भारतीय दूतावासाच्या कर्मचार्‍यांचा पत्ता नाही आणि रोमानियातील भारतीय दूतावासाला फोन केले तर कुणीही फोन उचलत नाही. रोमानियाच्या दिशेने उघडणार्‍या युक्रेनच्या बंद गेटकडे वाट बघत बसणे एवढेच विद्यार्थ्यांच्या हाती उरले आहे. आता काही तासांत बंद झालेल्या पोलंड सरहद्दीवरून निघालेल्या सहा हजार विद्यार्थ्यांची इथे भर पडली तर इथला गोंधळ आणखी वाढण्याची भीती आहे.
इथे तिष्ठत बसलेले विद्यार्थी संतप्त आहेत. मदत व सुटकेची मोहीम हाती घेतल्याचे बातम्यांमध्ये सांगितले जाते. मात्र कुठलाही समन्वय नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत आणि युक्रेनचे जवान अमानुष वागत आहेत. हे भारत सरकारला कळू द्या, अशा भावना व्यक्त करताना या विद्यार्थ्यांनी आपापल्या पोस्ट सोशल मीडियासाठी लिहून ठेवल्या आहेत. युक्रेनमधून रोमानियात प्रवेश करताच या सर्वांचे ट्विट एकाच वेळी पडतील. त्यातून तरी सरकारला आमचे हाल समजावेत.

भारताचे ऑपरेशन गंगा

करण प्रदीप पाटील हे विनीत्सीया विद्यापीठात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला आहेत. त्यांनी चेर्निवत्सी सरहद्दीवरील विद्यार्थ्यांचे हालहवाल रविवारी संध्याकाळी पोहोचवले. त्यांचे वडील प्रदीप पाटील यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांना उद्देशून ट्विट करीत या विद्यार्थ्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.

सुटकेची आशा

पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेवर जातीने लक्ष ठेवून आहेत. अधिकाधिक विमानांची व्यवस्था केली जात आहे. भारतीयांच्या मदतीसाठी युक्रेनच्या शेजारी देशांकडे पथके रवाना करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीयांचे आणि खास करून विद्यार्थ्यांचे सुरू असलेले हाल थांबतील अशी आशा आता निर्माण झाली आहे.

Back to top button