अबकारी घोटाळाप्रकरणी गरज पडल्यास एसीबीकडूनही तपास : मुख्यमंत्री सावंत | पुढारी

अबकारी घोटाळाप्रकरणी गरज पडल्यास एसीबीकडूनही तपास : मुख्यमंत्री सावंत

मोरजी; पुढारी वृत्तसेवा :  पेडणे अबकारी कार्यालयातील घोटाळ्याप्रकरणी तीन कर्मचारी निलंबित केलेले आहेत. आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. सध्या या प्रकरणांची दक्षता खात्यातर्फे चौकशी चालू आहे. वेळ पडल्यास भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडूनही (एसीबी) तपास केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिस स्थानक इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पेडणे अबकारी कार्यालयात 2 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाला आहे. या प्रकरणातील तीन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र आजपर्यंत या कर्मचार्‍यांवर किंवा जे संबंधित संशयित आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे नोंदवलेले नाहीत. ते का नोंदवले नाहीत? असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला, असता मुख्यमंत्री सावंत म्हणाले, या घोटाळ्यात जे सहभागी असतील त्यांची योग्य पद्धतीने चौकशी दक्षता खात्याकडून होईल. वेळप्रसंगी इतर विभागाची ही मदत घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Back to top button