गोव्याचे मंत्री चिखलकाल्यात रंगले; ‘हम्पाळा, हम्पाळा, खेळ खेळू गोपाळा’चा निनाद दणाणला | पुढारी

गोव्याचे मंत्री चिखलकाल्यात रंगले; 'हम्पाळा, हम्पाळा, खेळ खेळू गोपाळा'चा निनाद दणाणला

पणजी : पुढारी वृत्तसेवा : ‘हम्पाळा, हम्पाळा, खेळ खेळू गोपाळा, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ या गजरात आणि रिमझिम पडणार्‍या पावसात माशेल येथील देवकी कृष्ण देवस्थानच्या मैदानात पारंपरिक गोमंतकीय चिखलकाला झाला. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी खेळगडे बनून चिखलकाल्याचा आनंद लुटला.

उठाबशा, चक्र गोल, चेंडू फेक, दोन गटातील मिश्किल वादविवाद, न्हवरो-व्हकल हे पारंपरिक खेळ खेळण्यात आले. दोन वर्षांच्या बालकापासून ते ८० वर्षांच्या जेष्ठ व्यक्तीपर्यंत या चिखलकाल्यात सहभागी झाले होते.

यावेळी मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, आरोग्याच्या दृष्टीने चिखलकाला फायदेशीर आहे. त्यामुळेच पर्वजांपासून चालत आलेली ही परंपरा आजही सुरू आहे. आपल्या मतदारसंघात चिखलकाला होतो, याचा आपल्याला आनंद आहे. ‘हम्पाळा, हम्पाळा, खेळ खेळू गोपाळा आणि जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

दोन गटातील मिश्किल वादविवाद खेळाच्या वेळी सर्व खेळगडी दोन गटांत बसले आणि एकमेकांवर शिव्या शापांचा भडिमार केला. ‘न्हवरो- व्हकल’ या खेळात दोन मुलांना नवरा आणि नवरी बनवून नटवण्यात आले. लग्नाची वरात काढून लग्न लावून देण्यात आल्यावर खेळगड्यांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी फोडून काल्याची सांगता झाली.

हेही वाचा : 

Back to top button