पुणे: चातकाच्या हालचाली, हीच आमची वेधशाळा; शेतकऱ्यांची भावना | पुढारी

पुणे: चातकाच्या हालचाली, हीच आमची वेधशाळा; शेतकऱ्यांची भावना

कोंढवा (पुणे), पुढारी वृत्तसेवा: उशिरा का होईना मान्सूनला सूर गावसला. मात्र, सध्या पडणाऱ्या पावसाला जोर नाही. लागोपाठ चार दिवस मुसळधार पाऊस पडला, तर जमिनीची तहान भागेल अन् बी-बियाणे पेरता येईल. वातावरणातील बदल हा पिकांना पोषक ठरतो. चातकाच्या ओरडण्यावर पावसाची चाहूल लागते अन् आजपर्यंत हीच आमची वेधशाळा आहे, अशी भावना शेतकरी प्रकाश तरवडे यांनी मान्सूनच्या आगमनानंतर व्यक्त केली.

मान्सून वेळेवर आला, तर शेतकऱ्यांची वर्षाची चिंता मिटते. मात्र, यंदा पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. बोरवेलचे पाणी संपल्यात जमा आहे. यामुळे बागायती जमीन देखील ओसाड पडून आहे. निसर्गाने आतापासून व्यवस्थित साथ दिली, तर नक्कीच कडधान्य तरी घरात येईल, अशी आशा महंमदवाडी, उंड्री व वडाचीवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या परिसरात अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र, सिमेंटच्या जंगलात देखील शेती पिकविणारे अनेक शेतकरी या भागत आहेत. भाजीपाला, कडधान्य, बाजरी, गहू, मिरची, विविध प्रकारच्या फुलांचे मळे फुलविताना दिसतात. जमिनीला भाव आल्यामुळे काही जणांनी जमिनी विकल्या आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांनी जमिनी अद्यापही टिकवून ठेवल्या आहेत. तीन, चार महिन्यांची पिके मोजकेच शेतकरी घेताना दिसतात. अनेक जण पालेभाज्यांसह तरकारी पिके घेत आहेत. मात्र, या वर्षी कडक उन्हाळ्यामुळे विहिरी, बोअरवेल आठले. वळवाचा पाऊस हवा तसा पडला नाही. यामुळे चांगला पाऊस पडल्यानंतरच जमिनीमध्ये पिके व पालेभाज्या घेता येतील, असे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा:

वारकर्‍यांचा परतीचा प्रवास सुरू; नगर-सोलापूर महामार्गावर वाहनांची झुंबड

Solapur Accident News: शिरवळवाडीजवळ भीषण अपघातात ५ वारकरी महिलांसह मुलगा ठार; ७ जण जखमी

पुणे होणार ईलेक्ट्रीक वाहनांचे हब, बारा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक

 

Back to top button