संगीत-योगाचा संगम असलेले डिचोलीतील सायनेकर दाम्पत्य | Yoga Day 2023 | पुढारी

संगीत-योगाचा संगम असलेले डिचोलीतील सायनेकर दाम्पत्य | Yoga Day 2023

पणजी : गायत्री हळर्णकर : दरवर्षी 21 जून हा जागतिक योग दिवस तसेच जागतिक संगीत दिवस म्हणून साजरा केला जातो. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योगासह संगीतही महत्त्वाचे आहे. या दिवसाचे औचित्य साधून योगगुरु पंकज सायनेकर आणि त्यांची पत्नी गायिका मुग्धा यांच्याशी दै. ‘पुढारी’ने संवाद साधला. संगीत आणि योग याची उत्तम संगम असलेले डिचोलीतील हे दाम्पत्य आहे.

योग क्षेत्रात पंकज यांनी मोठं शिखर गाठलेलं आहे. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे महाराष्ट्र येथून योगशास्त्रात पदवी घेतली असून योगशास्त्राचा डिप्लोमादेखील केला आहे. त्यांच्या नावावर जगातील पाच मोठे जागतिक विक्रम आहेत. सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अखंड सूर्यनमस्कार घातल्याबद्दल चार विक्रम केले. आंतरराष्ट्रीय योग दिनी 24 तासात 5598 सूर्यनमस्कार घालून हार्वर्ड वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला आहे. लंडनच्या द वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना सूर्यनमस्कारात डॉक्टरेटची मानद पदवी प्रदान केली आहे. आयुष मंत्रालय, भारत सरकारसाठी योग गुरू म्हणून ते काम करत आहेत. मुग्धा यांनी संगीत क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. त्या सध्या संगीत क्षेत्रातील डॉक्टरेटचा अभ्यास करत आहेत. त्यांनी राज्यात होणार्‍या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या कला सादर करत आहेत.

योग दिनानिमित्त पंकज सायनेकर सांगतात, आम्ही स्वतःच्या अल्पमतानुसार कोणत्याही गोष्टींचे तर्कवितर्क करणे सोडून देऊ आणि स्वतःच्या ध्येयाप्रती आसक्त होऊ, तेव्हा आपण समजू की ती व्यक्ती स्थिर (म्हणजे मानसिक आणि बौद्धिक पातळीवर) झाली आहे. सर्वत्र मनुष्य अवास्तव कारणांसाठी स्वतःला गुंतवून ठेवतो आणि मग ताण-तणाव, द्वेष, अहंकार ओढवून घेतो. आजच्या काळात माणूस ऑफिस, घर, रोजची दगदग-धावपळ यामुळे एवढा गुरफटून गेला आहे की त्याला स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देता येत नाही. मनुष्य या सर्व धावपळीमुळे वेगवेगळ्या व्याधींमध्ये अडकतो आणि त्यामुळे आणखी अत्यवस्थ होतो. त्यामुळे घरात तणाव निर्माण होतात.

ही शारीरिक व्याधी मग फक्त त्या एका व्यक्तीपुरती सीमित न राहता त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो. यावरील सर्व व्याधींवर आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या कलहांवर उपाय म्हणजे स्थितप्रज्ञ होण्याचा प्रयत्न करणे. आजच्या काळात स्थितप्रज्ञ व्यक्तीची जी व्याख्या सांगितली आहे तिचे अवलंबन करणे हे निश्चितच कठीण आहे, पण प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे आम्ही नियमित सरावाद्वारे त्याची पूर्तता होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून आम्ही सर्व योग व्रतस्थ होऊया आणि स्थितप्रज्ञाची उंची गाठण्याचा निर्धार करूया, असे योगगुरु पंकज सायनेकर यांनी सांगितले.

संगीत रियाज- एक दृष्टिकोन

अलंकार घोटणार्‍या आणि अलंकार परीक्षेचा अभ्यास करणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की रियाज कसा करावा. या प्रश्नाला सामान्यतः एकच उत्तर असतं ‘पहाटेचा खर्ज रियाज. पण कलाकार जसजसा संगीताच्या समुद्रामध्ये हातपाय मारु लागतो, तेव्हा लक्षात येतं की रियाज म्हणजेच सराव हा विविधांगी आहे, असे गायिका मुग्धा यांनी सांगितले.

नियमित, दैनंदिन बैठक (सराव), या व्यतिरिक्त विद्यार्जन, श्रवण, सादरीकरण, वाचन, चिंतन, चर्चा तसेच विद्यादान या सर्वांचा समावेश म्हणजे परिपूर्ण रियाज. म्हणूनच बहुदा असे म्हणतात की, हाडाचा कलाकार क्षणक्षणाला संगीत जगतो. त्याच्या प्रत्येक श्वासागणिक साधना सुरू असते थोडक्यात रियाजाचा अभ्यास हा आजन्म करावा लागतो. नियमित बैठक या एकाच पैलूचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की अलंकार घोटणे, खर्ज रियाज, तानांचा रियाज, नोमतोम इत्यादींचा सराव हा झाला फक्त स्टार्टर. राग विस्तार, स्वरलगाव, विविध तालअंगाच्या बंदिशी, बंदिशीची कहन, बोलबाट इत्यादींचा रियाज हा झाला मेन कोर्स. उपशास्त्रीय प्रकारांचा अभ्यास हे झालं मिष्टान्न. हे जेवण कधी, कसं व किती ग्रहण करावं याचा अभ्यास हासुद्धा साधनेचा एक महत्त्वाचा पैलू आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रसन्नतेने, एकाग्रतेने केलेली साधला फलदायक

आंधळेपणाने, मरगळलेल्या मनाने व विचलित चित्ताने अनेक तास घोटत बसण्यापेक्षा डोळसपणे, प्रसन्नतेने व एकाग्र बुद्धीने केलेल्या कमी वेळेची साधना नक्कीच फलदायक ठरते. मुळात, कुठला कार्यक्रम स्वीकारावा हा तर वेगळाच अभ्यास आहे. जनमानसात स्वतःची ओळख कशाप्रकारची असावी याचा सखोल विचार व निर्धार प्रत्येक कलाकाराने केला पाहिजे. आजकाल ध्वनिसंयोजन, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण, छायामुद्रण हे ही घटक उत्तम सादरीकरणासाठी अभ्यासावे लागतात. कारण सोशल मीडिया हे आजच्या काळातील सादरीकरणाचं एक मोठं व्यासपीठ झालं आहे. प्रत्येक पैलूचा नियमित अभ्यास करणारा कलाकार हाच खरा ‘बुद्धिमान रियाजी’ होय, असे मुग्धा यांनी सांगितले.

Back to top button