Fertility Rate : गोव्यासाठी धोक्याची घंटा! प्रजनन दरात दिवसेंदिवस घसरण | पुढारी

Fertility Rate : गोव्यासाठी धोक्याची घंटा! प्रजनन दरात दिवसेंदिवस घसरण

पणजी : गायत्री हळर्णकर : गोव्यातील महिलांचा प्रजननाचा दर (Fertility Rate) सद्यस्थितीत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. याबाबतीत सिक्कीमनंतर (1.1 टक्के) गोव्याचा (1.3 टक्के) क्रमांक लागतो. राज्यातील डॉक्टरांकडून ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

बदलत्या काळात गोवा राज्य इतर राज्यांच्या तुलनेत वेगाने बदलत आहे. मानवी जीवनातही हे बदल होत आहेत. त्यामुळेच राज्याचा प्रजनन दर (Fertility Rate) वेगाने घसरत चाललेला आहे. 2019-20 मध्ये झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल-5 मध्ये गोव्याचा प्रजनन दर अवघा 1.3 टक्के इतका दाखवण्यात आलेला आहे. जो सिक्कीमनंतरचा सर्वात कमी दर आहे. त्याआधी केलेल्या सर्वेक्षणात गोव्यातील दर अधिक होता. पण त्यानंतर तो कमी होत राहिल्याचे या अहवालातून दिसून येते.

राज्यातील महिलांची मुलांना जन्माला घालण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळेच प्रजननाचा दर घटत चाललेला असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. राज्याचा जन्मदरही अवघ्या तीन वर्षांच्या काळात सरासरी चार टक्क्यांनी कमी झाल्याचे राज्य सरकारनेही जाहीर केले आहे. 2017 मध्ये गोव्याचा जन्मदर 13.3 टक्के होता. 2021 मध्ये तो 9.7 टक्क्यांपर्यंत आलेला आहे. प्रजननाचा दर कमी झाल्यामुळेच राज्याचा जन्मदरही घटल्याचे यातून स्पष्टपणे दिसून येते.

ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ सचिन नार्वेकर म्हणतात…

  • महिलांमधील प्रजनन क्षमता 25 ते 30 वयानंतर कमी होऊ लागते. 35 नंतर त्यात झपाट्याने घट होते.
  • गोव्यातील महिला करियरला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांच्या लग्नाला उशीर होतो. बहुतांशी मुलींची लग्ने 30 वयानंतर होतात.
  • खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे महिलांमधील लठ्ठपणाही वाढत आहे. यामुळे हार्मोनल असंतुलन होते. त्यामुळे प्रजनन क्षमताही कमी होत आहे.
  • लठ्ठपणा, मद्यपान आणि धूम्रपानामुळे पुरुषांमध्ये देखील शुक्राणूंची संख्या कमी होत आहे. या गोष्टींचाही प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे.

महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर | Fertility Rate

गोव्याच्या शेजारी असलेल्या महाराष्ट्रातही प्रजननाचा दर घसरत असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल-5 मधून समोर आलेले आहे. सिक्कीम, गोवा, पश्चिम बंगाल (1.6) नंतर या यादीत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो.

महाराष्ट्राचा प्रजनन दर 1.7 टक्के इतका आहे. कर्नाटक, हिमाचल प्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांतील प्रजनन दरही 1.7 टक्के इतका असल्याचे दिसून येते.

आयव्हीएफ पद्धतीचाही वाढला कल

विविध कारणांमुळे महिला नैसर्गिकदृष्ट्या आई होण्यास सक्षम नसतात. त्यामुळे त्या आयव्हीएफ पद्धतीने आई बनण्याचे सुख घेत आहेत. त्यामुळेही प्रजननाचा दर कमी होत असल्याचे समर आले आहे. आयव्हीएफ पद्धतीत महिलेच्या अंडाशयातून बीज घेऊन त्याला फर्टिलाइज केले जाते. त्यातून महिला मुलाला जन्म देऊ शकते, असे डॉ. सचिन नार्वेकर यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button