गर्भावस्था ही महिलांच्या आयुष्यातील एक नाजूक स्थिती; पाहा कशी घ्‍यावयाची काळजी | पुढारी

गर्भावस्था ही महिलांच्या आयुष्यातील एक नाजूक स्थिती; पाहा कशी घ्‍यावयाची काळजी

गर्भावस्था ही महिलांच्या आयुष्यातील एक नाजूक स्थिती असते. त्या काळात गर्भवतीची कितीही काळजी घेतली, तरी कमीच असते. तिला या काळात खूप जपावयाचे असते. गर्भधारणेची चाहूल लागताच महिलांनी आवश्यक त्या तपासण्या करून घेणे जरुरी आहे. गर्भावस्थेत महिला व होणार्‍या बाळासाठी अस्थमा हा आजार खूप त्रासदायक ठरू शकतो. त्यासाठी महिलांनी गर्भावस्थेत तपासणी करताना अस्थमा आहे किंवा नाही याचेही निदान करणे आवश्यक आहे. अस्थमावर वेळीच उपचार होणे जरुरीचे आहे. नाही तर त्या महिलेसाठी व होणार्‍या बाळासाठी ते धोकादायक असते.

अस्थमा झालेल्या गर्भवतींनी धूळ व सिगारेटच्या धुरापासून दूर राहिले पाहिजे. कारण, त्यापासून तिच्यासह पोटातील बाळाचा जीव गुदमरतो. गर्भधारणा झाल्यानंतर लागलीच महिलांनी अस्थमाचे निदान करून त्यावर उपचार सुरू केले, तर त्याचा होणार्‍या बाळाच्या आरोग्यावर काहीही परिणाम होणार नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वेळेत उपचार केले, तर दम्याने त्रासलेली गर्भवती सुरक्षित राहू शकते; मात्र वेळीच उपचार केला नाही, तर त्याचा गंभीर परिणाम होणार्‍या बाळामध्ये दिसून येतो.

गर्भामध्ये वाढ होत असलेल्या बाळाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण एकदम कमी होते. त्यामुळे बाळाची वाढ होणे थांबते. गर्भवाढीच्या द़ृष्टीने गर्भवतीेला अस्थमावर उपचार करून बाळाला ऑक्सिजनची पूर्तता करणे गरजेचे असते. गर्भावस्थेच्या द्वितीय, तृतीय महिन्यात अस्थमा वाढण्याला सुरुवात होते; मात्र स्त्रीला दोन-तीन आठवड्यांनंतर त्याची लक्षणे जाणवतात. तेव्हापासून स्त्रियांनी त्यावर उपचार सुरू केले पाहिजेत. कारण, प्रसूतीपर्यंत नियंत्रणात आणता येऊ शकते. अस्थमाग्रस्त महिला बाळाला दूध पाजण्यास तयार नसतात. त्यांना भीती असते की, त्यांच्या दुधाद्वारे बाळालाही अस्थमा होईल; मात्र हा गैरसमज त्यांनी आधी मनातून काढून टाकला पाहिजे.

Back to top button