उत्पल पर्रीकर विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम | पुढारी

उत्पल पर्रीकर विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल पर्रीकर याखेपेला विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. भाजपचे गोवा निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा यापूर्वीच व्यक्त केली आहे. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत उत्पल यांच्या नावाचा विचारही पक्षाने उमेदवारीसाठी केला नव्हता.

उत्पल यांनी मंगळवारी ‘पुढारी’च्या गोवा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी संपादकीय सहकार्‍यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपण याखेपेला विधानसभा निवडणूक लढवणारच असे ठामपणे सांगितले. ते म्हणाले, मी आता राज्यव्यापी दौराही करणार आहे. भाजपच्या जुन्या नेत्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे. बाबा, मनोहर पर्रीकर यांनी कष्टाने गोव्यात भाजप रुजवला तो वारसा मी सोडून देणार नाही. पणजीतील मतदार मला निवडणूक लढवा असे सांगत आहेत. त्यांचे म्हणणे मी खाली पडू देणार नाही, आशा आहे की मला भाजप पणजी मतदारसंघातून उमेदवारी देईल.

ते म्हणाले, फडणवीस यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. पणजी मतदारसंघात भाजपच्या मुळ कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यात मी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापुढे राज्यातील नेत्या कार्यकर्त्यांनाही भेटणार आहे. मी केवळ पणजी मतदारसंघापुरताच मर्यादीत नाही. बाबांचा वारसा माझ्यासोबत आहे, तो मी फुकट घालवणार नाही. मला भाजपने मोठी जबाबदारी दिली तर त्याचा फ़ायदा पक्षालाच होणार आहे. बाबांना मानणारे अनेक राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनाही नजीकच्या काळात भेटणार आहे. अलीकडेच मुंबईला मी जाऊन आलो. मी स्वस्थ बसलेलो नाही. पणजीतील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांच्याशी प्रतारणा मी कऱणार नाही.

दै. पुढारीच्या गोवा आवृत्तीचे निवासी संपादक सुरेश गुदले यांनी त्यांचे स्वागत केले.

लढण्याचा जनतेचा आग्रह

याआधी घडलेल्या कटू-गोड राजकीय आठवणी ताज्या करत उत्पल यांनी सांगितले की, भाजपचे पणजीतील मूळ कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत. तेच नव्हे तर पणजीतील स्व. मनोहर पर्रीकर यांना मानणारी जनता मला विधानसभा निवडणूक लढ असे सांगत आहे. त्यामुळे मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाजपने उमेदवारी आताही नाकारली तर काय, तर केवळ स्मित करून त्यांनी चेहर्‍यावर कोणतेही सूचक भाव येऊ दिले नाहीत; मात्र त्यांची देहबोली मात्र ते निवडणूक लढवतीलच असे सांगत होती.

Back to top button