धक्कादायक : चार हजार हॉटेल्स होती बेकायदेशीर | पुढारी

धक्कादायक : चार हजार हॉटेल्स होती बेकायदेशीर

पणजी : पुढारी वृत्तसेवा : पर्यटन क्षेत्रामध्ये अनेक बेकायदेशीर गोष्टी गेल्या काही वर्षांत सुरू होत्या. राज्यामध्ये फक्त दीड हजाराच्या आसपास हॉटेल्सची नोंदणी होती. ४ हजारांच्या आसपास हॉटेल्स अनधिकृतपणे सुरू होती. या सर्व हॉटेल्सना नोंदणी करण्यास भाग पाडले आहे. पर्यटकांवर होणारे हल्ले किंवा पर्यटकांनी नागरिकांवर | केलेले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

हणजूण येथे एका हॉटेल परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सोमवारी पोलिस अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी महानिरीक्षक ओमवीर सिंग, अधीक्षक निधीन वाल्सन उपस्थित होते.

बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्यात प्रत्यक्षात सहा हजारांच्या आसपास हॉटेल्स असतानाही नोंदणी केवळ दीड ते दोन हजार एवढी होती. पर्यटन खात्याने याचा अभ्यास करून नोंदणी न केलेल्या हॉटेल चालकांना नोंदणी करण्यास भाग पाडले आहे. हॉटेल मालकांनी पर्यटन खात्याकडे नोंदणी करून आपल्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी ऑनलाईन पद्धतीने कामगार खात्याकडे नोंद करावी. ते म्हणाले, पर्यटकाला मारहाण झाल्यानंतर त्याची तक्रार योग्य त्या कलमाखाली नोंद न केलेल्या पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे.

रात्री दहानंतर संगीतावर बंदीच रात्री दहानंतर : संगीत वाजवण्यावर बंदी आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत असल्यामुळे कुठल्याही हॉटेल मालकाने किंवा लोकांनी रात्री दहानंतर संगीत वाजवू नये. तसे केल्यास कडक कारवाई केली जाईल.

आमदार लोबो यांनी तक्रार द्यावी

हॉटेल मालकाकडे कुणीतरी हप्ते मागत असल्याचा आमदार मायकल लोबो यांचा दावा केलेला व्हिडीओ सध्या फिरत आहे. लोबो यांच्याकडे काही पुरावे वा नावे असल्यास त्यांनी ते द्यावेत. संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे उत्तर मुख्यमंत्री म्हणाले.

आग नियंत्रणात

राज्यभरात विविध ठिकाणी लागलेल्या आगी सध्या नियंत्रणात आलेल्या आहेत. वन कर्मचाऱ्यांना अग्निशमन व इतर खात्याच्या कर्मचाऱ्यांचा तसेच स्थानिकांचे सहकार्य लाभत आहे. स्वतःच्या जागेतही आग लावू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Back to top button