गोवा : एका असहाय्य मातेची आर्त हाक…; मुलांचा ताबा मिळण्याची प्रतीक्षा | पुढारी

गोवा : एका असहाय्य मातेची आर्त हाक...; मुलांचा ताबा मिळण्याची प्रतीक्षा

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असे म्हटले जाते. आईची महती व्यक्त करणे सोपे नाही. समुद्राची शाई केली, हिमालयाची लेखणी केली आणि आकाशाचा कागद केला तरीही आईच्या महतीचे वर्णन करणे अशक्य आहे. एकीकडे समाजात आईला देवाचा दर्जा दिला जातो आणि त्याच समाजात त्या आईपासून तिची तीन मुले हिसकावून घेतली जातात… अशी मन हेलावून टाकणारी घटना मडगावात समोर आली आहे.

कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्या दुर्दैवी आईच्या पहिल्या बाळाला हिसकावून ‘अपना घर’मध्ये डांबण्यात आले, दुसर्‍या नवजात मुलाचे मडगावातून अपहरण करण्यात आले तर तिसर्‍या नवजात मुलीला तिच्यापासून हिसकावून मातृछायेत पाठवण्यात आले आहे. स्वतःच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या मुलांना दूध पाजू न शकलेली ती असहाय्य आई आज आश्रयगृहात बंदिस्त आहे. सदर आई आपल्या मुलांची विक्री करत आहे, असा तिच्यावर पोलिसांनी आरोप लावला आहे. त्या स्वरूपाचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत. तिच्यावर तसा कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही. आरोप सिद्ध न झालेल्या गुन्ह्यासाठी बिचारी शिक्षा भोगत आहे. तिच्या तिन्ही मुलांची तिच्यापासून ताटातूट झाली आहे. मातृछायेत पाठवण्यात आलेली मुलगी तर अवघ्या तीन महिन्यांची आहे. आईच्या दुधासाठी ती व्याकुळलेली आहे. पण प्रशासनाच्या निर्दयीपणाच्या वागण्यामुळे आज त्या नवजात बाळावर कृत्रिम दूध पिण्याची वेळ आली आहे. बाळाला पाजता न आल्याने ती आई मनातून असंख्य वेदनांनी तळमळत आहे.

सविस्तर माहितीनुसार, 24 वर्षीय सदर महिला मूळ महाराष्ट्रातील आहे. आठ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. तिच्या मामाने तिचा नंतर सांभाळ केला. तिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. नातेवाईकांच्या जाचाला कंटाळून ती गोव्यात पळून आली होती.
उपजीविकेसाठी तिने वेर्णा औद्योगिक वसाहतीतदेखील काम केले आहे.

अत्याचाराला बळी पडल्यानंतर गरोदर राहिलेल्या त्या महिलेला मुले विकण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ज्यावेळी तिला अटक करण्यात आली त्यावेळी ती दीड महिन्याची गरोदर होती. या महिलेची शोकांतिका अशी की तिची पहिली प्रसूती पोलिसांच्या जीपमध्ये झाली. ती अटकेत असल्याने कुडचडेतील एका कुटुंबाने तिच्या मुलाचे पालनपोषण केले. पण एका समाजसेवी संस्थेने त्या कुटुंबाला तिने ते मूल विकले आहे, असा आरोप केल्यामुळे सरकारच्या बाल कल्याण समितीने त्या नवजात बाळाला त्या कुटुंबाकडून हिसकावून थेट ‘अपना घर’मध्ये पाठवले. चार वर्षे तो मुलगा अजून ‘अपना घर’मध्येच आहे, अशी माहिती ‘बायलांचो एकवट’च्या अध्यक्ष आवदा व्हीएगस यांनी दिली.

त्या महिलेला झालेले दुसरे मूल मालभाट परिसरातून चोरण्यात आले होते. तिने स्वत: त्याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. पण उलट तिच्यावरच मूल विकल्याचा आळ घालण्यात आला. त्या मुलाला शोधण्यासाठी पोलिस मुंबईपर्यंत जाऊन आले आहेत. हा गुन्हा अजूनही सिध्द झालेला नसताना ती मुले विकत असल्याचा डाग मात्र तिच्यावर लावण्यात आलेला आहे.

सध्या ती आपल्या मित्रासोबत राहत आहे. तिला चार महिन्यांपूर्वी एक मुलगी झाली आहे. या बाळाच्या आधारावर आयुष्य काढण्याची स्वप्ने पाहणार्‍या त्या आईकडून पुन्हा तिचे बाळ हिसकावून घेण्यात आले आहे. बाल कल्याण समितीने फातोर्डा पोलिसांच्या मार्फत तिला राहत्या घरातून पकडून आश्रय गृहात पाठवले आहे. तर तिच्या बाळाची रवानगी मातृछायेत केली आहे. दोन अपत्यांप्रमाणे याही बाळाची तिच्यापासून ताटातूट झाली आहे.

आईला जगण्यासाठी आधार ठेवला नाही : व्हिएगस

आवदा व्हिएगस यांनी ‘पुढारी’जवळ बोलताना, प्रशासनाने त्या दुर्दैवी आईला जगण्यासाठी आधार ठेवला नाही, असा आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही नवजात बालकाला त्याच्या आईपासून हिरावता येत नाही. त्या महिलेवर मुलांना विकल्याचा कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही. आपल्या मुलांना पाहण्यासाठी तिचा जीव तळमळत आहे. तिच्यावर संशय असल्यास तिच्यावर पोलिसांकरवी पाळत ठेवली जाऊ शकली असती. तिची मुले हिरावून बाल कल्याण समितीने माणुसकीला काळिमा फासला आहे, असे व्हिएगस म्हणाल्या. आपली मुले परत मिळावीत यासाठी तिने दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केल्याची माहिती व्हिएगस यांनी दिली.

Back to top button