गोवा : हिप्पींमुळे गोमंतकांत रुजला ड्रग्ज; बंधने टाळण्यासाठी गोव्याचा आसरा | पुढारी

गोवा : हिप्पींमुळे गोमंतकांत रुजला ड्रग्ज; बंधने टाळण्यासाठी गोव्याचा आसरा

मडगाव; विशाल नाईक : कॅसिनो, अमलीपदार्थ आणि अलीकडे घडणार्‍या विविध वाईट घटनांमुळे गोव्याची नकारात्मक ओळख जगाच्या नकाशावर होत चालली आहे. गोवा राज्य साठ आणि सत्तरच्या दशकात हिप्पींसाठी दुसरा स्वर्गच होता. साठच्या दशकातील युरोप आणि अमेरिकेतील काऊंटर कल्चरच्या हिप्पींमुळे सोनेरी वाळूसाठी प्रसिद्ध असणार्‍या गोव्याची ओळख बदलून गेली.

अधिकारांचा अभाव, हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी पोलिस स्थानके आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव असलेल्या गोव्याकडे हिप्पी आकर्षित होत गेले. त्यावेळी आठवडाभर किनार्‍यावर चालणार्‍या रॉक संगीताने धुमशान घातले होते. हशिष व एलसीडी, एमडीएमए आणि चरस असे जे ड्रग्ज 1995 पर्यंत अमेरिकेत कायदेशीर होते ते सर्व ड्रग्ज रेव्ह पार्टी आणि फूल्ल मून पार्टी, हणजूणेतील फ्लि मार्केटमधून खुलेआम विकले जात होते. हिप्पींमुळेच त्यावेळेपासून गोव्याला ड्रग्जची कीड लागली.

पोर्तुगीजांच्या जुलुमी राजवटीतून गोवा नुकताच मुक्त झाला होता. त्यामुळे विदेशी संस्कृतीचा प्रभाव गोमंतकियांवरून कमी व्हायला बराच वेळ लागला. हिप्पी संस्कृतीत वाढ होत चालली होती. हिप्पींना बंधने नको होती. त्यामुळे त्यांची पावले दक्षिण आशियाकडे वळू लागली होती. शांत आणि सुशेगाद गोवा हिप्पींना भुरळ घालत होता. साठच्या दशकात गोव्यात पोलिस स्थानकांचा अभाव होता हे देखील हिप्पी संस्कृती इथे रुजण्याचे प्रमुख कारण होते. गोयकारांच्या शांत आणि सुशेगाद वृत्तीकडे ते आकर्षित होत होते. त्याला आध्यत्मिक ओढीची साथ मिळाली होती.

देशाचे सर्वात लहान राज्य, जे 1961 मध्ये भारताला जोडले गेले होते. पूर्वी पोर्तुगीज वसाहती होत्या आणि देशाच्या इतर भागांपेक्षा परदेशी लोकांचे अधिक स्वागत करणारे युरोपीय प्रभाव होते. भारतातील एका छोट्या राज्यात सर्वसमावेशक संस्कृती आहे, शांततेची भावना आहे, सोनेरी वाळू आहे, अधिकाराच्या तुलनेचा अभाव आहे आणि अमली पदार्थ सेवनांकडे एक आध्यत्मिक औषध म्हणून पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन आहे, हे जाहीर होऊ लागल्याने 1962 नंतर जगभरातील हिप्पी प्रवाहात येऊ लागले.

दक्षिण गोव्यातील कोलवा आणि उत्तर गोव्यातील हणजूणे हे समुद्र किनारे हिप्पीसाठी नंदनवन होते.1962 ते नव्वदच्या दशकापर्यंत हिप्पी गोव्यात राहिले. फूल मून पार्ट्यांसाठी उत्तर गोवा प्रसिद्ध होता. चांदण्या रात्रीत संगीताच्या तालावर फूल मून पार्ट्यांचे आयोजन होत होते. त्यासाठी आठ बोटांचा एडी हा विदेशी संगीतकार गोव्याला भुलला होता. रेव्ह पार्ट्यात एलएसडी, हशिष, एक्ट्रेसी, चरस, एमडीएमए सारख्या नृत्यासाठी उत्तेजित करणार्‍या ड्रग्जची उघडपणे विक्री होत होती. मनाली शीटच्या नावाखाली काळा चरस विकला जात होता. हणजूणेतील फ्लि मार्केट तर ड्रग्जच्या विक्रीसाठी खास ओळखले जात होते. रेव्ह कास्टल, सनी शेडर, मायकल पल्मेरी यांच्या 70 च्या दशकातील चित्रातून या घटनांना उजाळा मिळतो.

अमेरिकेत 1968 ते 1985 पर्यंत एलसीडी, एमडीएमए आदी ड्रग्ज कायदेशीर होते. अनेक परदेशी लोकांना चरसनेही भुरळ घातली होती. विदेशात मराजुआना आणि केनेबिस म्हणून ओळखला जाणारा चरस तसेच उत्तर भारतातील गांजा मिळायचा. गांजा किंवा चरस उत्तर भारतातून गोव्यात आणण्यासाठी हिप्पी कारणीभूत आहेत.

मासळीसाठी गोवा प्रसिद्ध होता. किनारपट्टी भागातील लोक पोर्तुगीजांच्या विचारसरणीपासून दुरावले नव्हते. हिप्पींकडूनच मनालीला मल या नावाखाली काळ्या चरसची विक्री हणजूणेत होत असल्याचे पुरावे आढळतात. ज्यो बनाना आल्मेडा नावाच्या गोव्यातील स्थानिकाने हणजूणे येथे स्थापन केलेला कॅफे पर्यटकांना स्थानिक संस्कृतीशी परिचित होण्यास कारणीभूत ठरला. कोकणी भाषिक आणि पाश्चात्य जगातून येणारे हिप्पी स्वरुपी अभ्यासक यांच्यातील अंतर कमी होत गेले. रात्रभर चालणार्‍या रेव्ह पार्ट्या केंद्रबिंदू बनत चालल्या होत्या. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचे उत्सव आठवडाभर चालत होते. कालांतराने गोव्याचे पारंपरिक संगीत देखील गिटार वाजवणार्‍या सायकेडेलिक रॉकपासून प्रख्यात झाले. गोवा हे इलेक्ट्रॉनिक संगीत असलेले पहिले भारतीय राज्य बनले.

ड्रग्जचे नवे पर्व सुरू

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, गोव्यात वाजवलेला पहिला इलेक्ट्रॉनिक ट्रॅक हा क्राफ्टवेर्क या जर्मन बँडचा 1970 मधील डिस्को ट्रॅक होता. त्यानंतर राज्याने इलेक्ट्रॉनिक संगीतात बदल पाहिला. नैसर्गिक ड्रग्जची जागा केमिकल ड्रग्जने घेतली. कोकेन, एसिड पेपर्स आणि एसिड ड्रग्जचे नवीन पर्व सुरू झाले. सध्या राज्यात पार्ट्यांचेही मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण केले जाते. हिप्पी संस्कृती गोव्यातून नामशेष होऊन गेली तरीही त्यांनी मागे ठरवलेली ड्रग्ज संस्कृती गोव्याच्या पिढीला आतून पोकळ करू लागली आहे.

Back to top button