दक्षिणेत ‘पॉप्युलर’चे 29 जण ताब्यात | पुढारी

दक्षिणेत ‘पॉप्युलर’चे 29 जण ताब्यात

मडगाव ः पुढारी वृत्तसेवा :  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देशव्यापी संघटनेवर बंदी घातल्यानंतर गोव्यात या संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. दक्षिण गोव्यात बुधवारी दुपारपर्यंत एकूण 29 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये सासष्टीतील 14 जण आहेत. या कारवाईमुळे पीएफआयचे कार्यकर्ते, वरिष्ठ नेते फोन बंद ठेऊन भूमिगत झाले आहेत.

यासंबंधी दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांना विचारले असता, आम्ही अजून कोणालाही अटक केलेली नाही; पण प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. जर या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कुठल्याही हरकती दिसून आल्या तर आम्ही त्यांना त्वरित अटक करू, असे त्यांनी सांगितले. पोलिसांचे या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर बारीक लक्ष असेल. कारवाईसाठी प्रत्येक आवश्यक पाऊले उचलली जातील, असे ते म्हणाले.

प्राप्त माहितीनुसार, मायणा कुडतरी पोलिसांनी रुमडामळ येथील वादग्रस्त पंच उमरान पठाण बाला याला बुधवारी दुपारी ताब्यात घेतले. पीएफआयचे गोवा प्रमुख शेख अब्दुल रौफ यालाही बुधवारीच पोलिस स्थानकात बोलावून घेतले होते. फातोर्डा भागात कार्यरत असलेला पीएफआयचा नेता शेख मुझ्झफर यालाही मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय अन्य काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फोंड्यात आठ जणांना अटक

फोंड्यात पॉप्युलर फ्रंटच्या काही कार्यकर्त्यांची बुधवारी फोंडा पोलिसांनी धरपकड केली. पोलिसांनी आठ जणांना पकडून त्यांची चौकशी केली. पाच लाख रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका केली. अटक करण्यात आलेल्यांत बहुतांश जण कुर्टी – फोंडा येथील रहिवासी आहेत. हे आठही जण पॉप्युलर फ्रंटसाठी काम करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी धरपकड केली.

अटक करण्यात आलेल्यांत मुल्ला अमीन मुजावर (रा. हवेली , 64 ), सादिक हसन मुल्ला नागा मशीद (रा. कुर्टी, 61), मुल्ला अब्दुल रौफ मुजावर नागा मशीद (रा. कुर्टी, 50), निसार झकारिया शेख (रा. सपना पार्क बेतोडा, 50 ), मुल्ला महंमद सय्यद (रा. कुर्टी 47 ), मुल्ला अब्दुल मुनाफ (रा. हवेली – कुर्टी, 50), मुल्ला अब्दुल करीम नागा मशीद (रा. कुर्टी, 52 ) आणि सलाउल्ला युसुफ सय्यद (रा. नागा मशीद कुर्टी) या संशयितांचा समावेश आहे.

वास्कोत सात जणांची चौकशी

वास्को : पीएफआयवर पाच वर्षे बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर येथील सात मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांना वास्को पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना मुरगाव उपजिल्हाधिकारीसमोर उभे केले. चौकशीअंती त्यांच्याकडून उपजिल्हाधिकारी रवीशेखर निपाणीकर यांनी वैयक्तिक हमीपत्र घेतल्यावर त्यांना सोडण्यात आले. आम्ही निष्पाप असून आमचा पीएफआयशी कोणताही संबंध नसल्याचे त्या
सात जणांनी सांगितले. आमच्या हातून देशहिताआड कोणती गोष्ट घडली नाही व घडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button