गोवा : 2022 च्या टेकऑफसाठी ‘पर्यटन’ सज्ज | पुढारी

गोवा : 2022 च्या टेकऑफसाठी ‘पर्यटन’ सज्ज

2022 चा पर्यटन हंगाम गोव्याच्या पर्यटनात पूर्णपणे नव्या अनुभवांचा साक्षीदार राहणार आहे. सर्व संबंधित सरकारी खात्यांचे समर्पित प्रयत्न, लाभधारकांच्या मौल्यवान सूचना व माझे मंत्रिमंडळातील सहकारी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बिनशर्त पाठिंब्यातून आम्हाला राज्याच्या पर्यटन क्षेत्रातील व्यवसायांत सुलभता आणण्यासाठी विविध प्रक्रियांचा अंमल करणे शक्य झाले आहे.

नोंदणी आणि प्रमाणननासाठी दस्तावेज प्रक्रियेत कपात, दस्तावेजांच्या डुप्लिकेशनशिवाय सुलभ नूतनीकरण, कमी ऑपरेशनल प्रतिबंध आणि लवचिकतेसारखे नवीन आणि सरलीकृत प्रक्रियेचे काही व्यापक पैलू आहेत. त्यांचा उद्देश गोव्याच्या पर्यटन उद्योगातील प्रक्रियात्मक विलंब दूर करणे हाच आहे. या प्रक्रियात्मक सुधारणा आणि सुलभतेचा लाभ अगदी मोठ्या गुंतवणूकदारांपासून मोठे भागधारक ते अगदी लहान गुंतवणूकदार किंवा सेवा पुरवठादारांपर्यंत सर्वांनाच अपेक्षित आहे.

पर्यटन उद्योगात सुलभीकरणासाठी ज्या प्रक्रियांचा अंमल करण्याचा निर्णय म्हणजे मी आणि माझ्या टीमने या उद्योगाला उभारणी देण्याच्या प्रक्रियेत उचललेला खारीचा वाटा आहे. सुलभता आणण्याच्या प्रक्रियेला संबंधितांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद आणि शाबासकीची थापही मिळाली आहे. तरी या उद्योगात सुलभता आणण्यासाठी केलेल्या आमच्या प्रयत्नांचे वास्तविक परिणाम आणि प्रतिक्रियांच्या पुनरावलोकना नंतरच खरे तर आम्ही प्रशंसेसाठी पात्र ठरू.

आंतरग्राम पर्यटन म्हणजेच हिंटरलँड टूरिझममध्ये प्रवेश करणे हा एक महत्त्वाकांक्षी असा उपक्रम ठरेल. त्यात राज्याच्या अंतर्भागातील अधिकाधिक लोकांना पर्यटन क्षेत्रात सामील करून घेऊन त्याद्वारे अधिकाधिक रोजगार उपलब्ध करणे व महसूल गोळा करण्यासाठी योगदान देण्याचे काम केले जाईल. सोप्या व प्रक्रियात्मक सुलभतेमुळे हे अपेक्षित आहे. होम स्टे च्या प्रक्रियांमध्ये देखील अधिक लवचिकता आणून सेवा दराच्या दृष्टीनेही होम स्टे मालक आणि पर्यटक अशा दोघांनाही त्याचा लाभ मिळेल.

हॉटेल उद्योगासाठी प्रक्रियात्मक अंकुश आणि विलंब कालावधी तसेच कागदपत्रांच्या आवश्यकतेमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. शॅक्सची कार्यप्रणाली तसेच समुद्र किनारी टाकण्यात यावयाची छत्री, डेकबेड यांसारख्या किनार्‍यावरील सुविधांची उपलब्धी देखील किमान कागदपत्रांसहीत वाढीव लवचिकता ठेवून सुव्यवस्थित आणि सुनिश्चित करण्यात आली आहे.

अधिक वैविध्य देऊ शकणार्या मोठ्या खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी साहसी खेळांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. सुरक्षितता आणि सेवेशी कोणतीच तडजोड न करता जलक्रिडा (वॉटर स्पोर्टस्) क्षेत्रात प्रक्रियात्मक सुलभतेला वाव देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. व्यवसायासाठीची सुलभता वाढवून त्यात सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न करतेवेळीच सुरक्षा प्रक्रिया, विमा, साधनांची गुणवत्ता, कर्मचारी प्रशिक्षण इत्यादींमध्ये कोणतीही शिथिलता येणार नाही याची काटेकोर काळजी घेण्यात आली आहे. सुरक्षा विषयीच्या या पैलूंचे वेळोवेळी पुनराव लोकन करून ते अधिक प्रभावी करण्याचा नेहमीच प्रयत्न असेल.

आंतरराष्ट्रीय प्रवासावरील कोव्हिड प्रतिबंधांमध्ये शिथिलता आणि मोपा विमानतळाच्या रूपाने गोव्यात आणखी एक हवाई मार्ग (एअर कॉरिडॉर) सुरू केल्याने परदेशी तसेच देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला या सगळ्या उपक्रमांमुळे नवी दिशा मिळेल यात तीळमात्रही शंका नाही.

2022 च्या पर्यटन हंगामासाठी टेक ऑफ करण्यास गोवा पर्यटन उद्योग सज्ज झाल्याने या क्षेत्राची गुंतवणूक वाढवणे, व्यवसायाच्या नव्या संधींचा विस्तार करणे, रोजगार आणि महसूल निर्माण करून गोव्याला पर्यटकांच्या पसंतीचे अंतिम पर्यटन स्थळ बनविण्याचे उद्दिष्ट्ये ठेवण्यात आले आहे.

 

Back to top button