गोवा : ‘हर घर जल’मध्ये गोवा अव्वल | पुढारी

गोवा : ‘हर घर जल’मध्ये गोवा अव्वल

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय जलशक्‍ती मंत्रालयाच्या जल जीवन अभियानांतर्गत 100 टक्के ‘हर घर जल’ प्रमाणपत्र प्राप्त करणारे गोवा हे पहिले राज्य बनले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या पाठिंब्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने गोव्यातील प्रत्येक घरापर्यंत नळपाणी जोडणी पोहोचवून हर घर जल हे अभियान राबविले. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला पाच वर्षांत नळपाणी पुरवठा करण्याचे मोठे कार्य साध्य करण्यासाठी 3.60 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये 3.8 कोटी कुटुंबांना नळाचे पाणी देण्यासाठी 60 हजार कोटी रुपये ‘हर घर जल’ साठी दिले आहेत.

2021-22 मध्ये, 26,940 कोटी रुपये 15 व्या वित्त आयोगाने ग्रामीण स्थानिक संस्थांना (पीआरआयएस) पाणी आणि स्वच्छतेसाठी अनुदान म्हणून राज्यांना दिले आहेत. पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे 2025-26 पर्यंत 1,42,084 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची खात्री देण्यात आली आहे. देशभरातील ग्रामीण भागात या मोठ्या गुंतवणुकीमुळे आर्थिक घडामोडींना गती मिळत आहे. गावांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Back to top button