गोवा : सत्तरीत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज | पुढारी

गोवा : सत्तरीत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

वाळपई; पुढारी प्रतिनिधी :  सत्तरी तालुक्याच्या बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. बुधवारी 94 मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया होेणार आहे. त्यासाठी 550 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक अधिकारी कौशिक देसाई यांनी दिली. तालुक्यातील एकूण बारा ग्रामपंचायतीच्या एकूण 94 प्रभागांमध्ये ही निवडणूक घेण्यात येणार आहे.

निवडणूक अधिकारी कौशिक देसाई म्हणाले, तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण 550 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या केंद्रांवर कर्मचार्‍यांची रवानगी करण्यात आली असून सर्वांनी मतदान केंद्राचा ताबा घेतल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात सर्व कर्मचार्‍यांना योग्य स्तरावर प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मतदान करणार्‍या मतदारांसाठी आवश्यक ओळखपत्र या संदर्भाचे सविस्तरपणे माहिती देण्यात आली असल्याचे ते
म्हणाले.

सत्तरी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व कर्मचारी विना अडथळा पोहोचले असून सर्वांनी मतदान केंद्राचा ताबा घेतल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. ठाणे पंचायत क्षेत्रातील सुरला या ठिकाणी मतदान केंद्राचा ताबा कर्मचार्‍यांनी घेतल्याचे यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते म्हणाले की, सर्व मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त चोख करण्यात आलेला आहे. निवडणूक आयुक्तांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच मतदान प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. यामुळे कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये अशा प्रकारचे आवाहन फडते यांनी केलेले आहे. सत्तरी तालुक्यामध्ये आतापर्यंत शांततेने मतदान होत असल्याची इतिहास आहे. यामुळे यंदाची निवडणूक शांततेने पार पडेल अशा प्रकारचे आशा निरीक्षकांनी व्यक्त केलेली आहे.

11 पंचांची बिनविरोध निवड

सकाळी तालुक्यात एकूण बारा ग्रामपंचायत आहेत. या बारा ग्रामपंचायतीमधून एकूण 94 प्रभाग आहेत. त्याच्या प्रभागातून आतापर्यंत 11 पंच सभासदांची बिनविरोध निवड झालेली आहे. उर्वरित प्रभागांमध्ये बुधवारी निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.

भरारी पथक सक्रिय

पंचायत निवडणुकांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणात शाब्दिक चकमकी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी भरारी पथक सक्रिय करण्यात आलेली आहे. सर्व पथकाला योग्य स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले असून मतदान केंद्रावर वारंवारपणे भेटी देऊन ते या संदर्भाचा आढावा घेणार आहेत. कोणत्याही क्षणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासंदर्भाची सूचना निवडणूक अधिकार्‍यांना करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी कौशिक देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

रिंगणातील उमेदवार

पिसुर्ले: 13
होंडा : 36
खोतोडा: 22
पर्ये: 36
गुळेली : 16
भिरोंडा: 13
ठाणे : 25
सावर्डे : 22
नगरगाव :21
केरी : 28
म्हाऊस: 18
मोर्ले : 23

Back to top button