गोवा : वास्को कदंबामधील आसने गायब | पुढारी

गोवा : वास्को कदंबामधील आसने गायब

वास्को;  पुढारी वृत्तसेवा :  वास्को-मडगाव मार्गावरील कदंब बस क्रमांक जीए-03-एक्स-0088 च्या शेवटच्या आसनापुढील तीन आसने गायब झाल्याने मागील आसनावर बसलेल्या प्रवाशांना गैरसोय होते. याप्रकरणी गोवा कॅनने दखल घेतली असून, लवकरच कदंब परिवहन महामंडळ लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकाला पत्र लिहण्यात येणार असल्याचे गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन्स यांनी सांगितले.

प्रवाशांना अधिकाअधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याऐवजी कदंब महामंडळ नुकसान कसे सहन करते, हे सांगण्यात धन्यता मानणारे काही अधिकारी आहेत. वास्को- मडगाव मार्गावरील कदंब बस क्रमांक जीए-03-एक्स-0088ची तीन आसने काढण्यामागील काही कारण असू शकेल. मात्र, शेवटच्या आसनावर बसणार्‍या प्रवाशांची गैरसोय होईल, हे लक्षात घेण्याचे श्रम कोणी घेतले नाही.

तीन आसने काढल्याने शेवटच्या आसनावर बसणार्‍या प्रवाशांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. बसचालकाने ब्रेक लावल्यावर आपला तोल संभाळण्यासाठी त्या प्रवाशांना खबरदारी घ्यावी लागते. पकडण्यासाठी काहीच नसल्याने बसलेल्या आसनाला घट्ट पकडून धरण्याची धडपड करावी लागते. ही धडपड केली नाही तर त्यांना बसमध्ये साष्टांग नमस्कार घालावा लागतो. याप्रकरणी संबंधित अधिकारी वर्गाने यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे.

Back to top button