गोवा : बालकांना छोट्या फोडांचा आजार | पुढारी

गोवा : बालकांना छोट्या फोडांचा आजार

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील काही बालकांच्या हात, पाय व तोंडात तांबड्या रंगाचे छोटे फोड येणारे प्रकार वाढले आहे. हा आजार 1 ते 3 वर्षांच्या बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असून, पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

या संदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ. वीरेंद्र गावकर म्हणाले की, सध्या या रोगाचे प्रमाण कमी आहे. नोव्हेंबरपासून या रोगाचा प्रादुर्भाव झालेली मुले जास्त आढळली आहेत. आपण जूनपासून अशा रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. हा आजार 1 ते 3 वर्षे वयोगटातील मुलांना होतो. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.

आजाराची लक्षणे…
हा आजार विषाणूमुळे होत असून लक्षणांमध्ये सामान्यतः ताप तसेच पाय, हात, मांड्या, डोळे, नितंब, तोंडाभोवती आणि घशात तांबड्या रंगाचे लहान फोड येतात. त्यामुळे अंगाला खाज येणे आणि घसा दुखणे हे प्रकार होतात. बाधित बालकांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार केले पाहिजेत. हा आजार संक्रमण पसरवणारा असल्याने बाधिताला किमान सात दिवस घराबाहेर पडू देऊ नये, असेही डॉ. वीरेंद्र गावकर यांनी सांगितले. हा मंकीपॉॅक्सचा प्रकार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button