पर्यटन सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडे करणार विनंती | पुढारी

पर्यटन सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडे करणार विनंती

पणजी; पुढारी वृत्तसेवा : तिसर्‍या लाटेचीही भीती आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांतील कोरोनाची स्थिती काय राहतेय हे पाहणे आवश्यक आहे, त्यानंतरच पर्यटन सुरू करण्याचा विचार होईल. पर्यटन सुरू करण्याबाबत गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (जीसीसीआय) आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाने (टीटीएजी) केलेल्या मागणीविषयी सकारात्मक माहिती केंद्र सरकारकडे कळविली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

राज्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांना पर्यटन नियम व अटीनुसार सुरू करावे, या मागणीचे निवेदन जीसीसीआय आणि टीटीएजी या संघटनांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मंत्रालयात भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना सादर केले. याप्रसंगी जीसीसीआयचे अध्यक्ष राल्फ डिसोझा, टीटीएजीचे अध्यक्ष नीलेश शाह, चार्टर ऑपरेटर इर्नेस्ट डायस व इतर सदस्य उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या चर्चेविषयी टीटीएजीचे अध्यक्ष नीलेश शहा यांनी दै. ‘पुढारी’ला सांगितले की, इतर देशांत पर्यटन सुरू झाले आहे. इतर देशांतून आंतरराष्ट्रीय चार्टर विमाने केवळ गोव्यात येतात. त्यामुळे चार्टरद्वारे येणार्‍या पर्यटकांना व्हिसा आणि चार्टर सुरू करण्यासाठी केंद्राकडून राज्य सरकारने परवानगी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पर्यटनावर राज्याचे आर्थिक व्यवहार अवलंबून आहेत. दोन वर्षांत पर्यटन ठप्प असल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे, तरीही लोक त्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. पर्यटनामुळे एकमेकांवर अवलंबून अनेक व्यवसाय आहेत, त्यामुळे राज्य सरकारने त्याचा विचार करायला हवा, असेही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी शिष्टमंडळाने केलेल्या सूचना आणि मागण्या ऐकून घेतल्यानंतर याविषयी केंद्र सरकारकडे या मागणीविषयी चर्चा करू. केंद्र सरकारच याविषयी निर्णय घेऊ शकते. त्याशिवाय कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे. दोन महिन्यांतील कोरोनाची स्थिती पहावी लागणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळास सांगितले.

Back to top button