लता मंगेशकर : दीदींचा गोव्याशी विशेष ऋणानुबंध ! | पुढारी

लता मंगेशकर : दीदींचा गोव्याशी विशेष ऋणानुबंध !

पणजी, पुढारी वृत्तसेवा :  ‘मेरी आवाजही ही पहचान है…’ हे लतादीदींची समर्पक ओळख. गोव्याचे आणि त्यांचे नाते मात्र खूप खास आहे. गोव्याशी त्यांचा ऋणानुबंध आहे.

गोव्यातील मंदिरे, येथील खाद्यसंस्कृती याची त्यांना नेहमीच ओढ होती. गोमंतकीय मराठी आणि कोंकणी या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रेम होते. गोमंतकीय साहित्य आणि साहित्यिकांबद्दलही त्यांना ममत्व होते. गोमंतकीय खाद्यपदार्थांमध्ये मासे हे त्यांचे प्रिय खाद्यान्न. येथील विविध माशांची नवे त्यांना तोंडपाठ होती. मुर्दोशी व बांगडे हे त्यांचे आवडते मासे होते. त्या दरवर्षी कुटुंबासह मंगेशी मंदिराला भेट देत असत. वडिलांच्या संगीताची सुरुवात इथून होती. त्याकाळात रंगमंचीय संगीत कार्यक्रमात संगीतसाथ गोव्यातील कलाकार देत असत. त्यामुळे त्या कलाकारांशीही त्यांचा एक वेगळा जिव्हाळा होता. मात्र इथे

विविध कार्यक्रमांसाठी त्या अनेकदा गोव्यात येऊन गेल्या होत्या. १९९८ साली गोमंतक मराठी अकादमीच्या ‘मराठी भवन’ या वास्तूच्या शिलान्यासासाठी त्या गोव्यात आल्या होत्या. त्याच्या आधीच्या दिवशी पणजीतील आझाद मैदानावर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. २९ डिसेंबर १९९९ ते २९ डिसेंबर २००० हे वर्ष दीनानाथ मंगेशकर यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते.

यादरम्यान आयोजित ‘दीनानाथ मंगेशकर दर्शन सोहळा’ या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी त्या गोव्यात मुक्कामास होत्या. ४ व ५ नोव्हेंबर २००० ला हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात त्यांना चतुरंग पुरस्काराने सन्मानित करण्याचे जाहीर करण्यात आले. दीदींनी २९ डिसेंबर २००० रोजी हा पुरस्कार स्वीकारला. वडिलांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाची कृतज्ञतापूर्वक नोंद घेतली.

कला अकादमी मध्ये मुंबईच्या चतुरंग संस्थेने एक कार्यक्रम घडवून आणला त्यासाठीही त्या गोव्यात आल्या होत्या. २०११ साली स्वस्तिक आयोजित ‘स्वरमंगेश’ या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राच्या उदघाटनाला त्या गोव्यात आल्या होत्या. त्यावेळी डॉ. पांडुरंग गांवकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला होता. ही त्यांची भेट म्हणजे त्यांची शेवटची भेट होती. त्यानंतर त्यांना गोव्यात येण्याचा योग्य आला नाही. लतादीदी व गोवा याबद्दल अनेक दंतकथा आहेत. मात्र लतादीदींच्या बोलण्यातून नेहमीच त्यांचे गोव्याबद्दलचे प्रेम व ऋणानुबंध दिसून येत.

गोवेकरांबद्दल एकच खंत

गोव्याबद्दल मनापासून प्रेम असूनही गोवेकरांनी मंगेशकर भावंडाना फार जवळ केले नाही. अशी एक खंत त्यांना होती. मराठी भवनच्या शिलान्यासाच्या वेळी त्यांनी खाजगी गप्पांमध्ये ही खंत बोलून दाखविली. असे या कार्यक्रमाच्या संयोजनाच्या समितीतील दिलीप धरवाडकर यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button