रॉकेट मॅन : डॉ. एस. सोमनाथ | पुढारी

रॉकेट मॅन : डॉ. एस. सोमनाथ

रॉकेटतज्ज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांची इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक झाली आहे. पीएसएलव्ही हा स्वदेशी बनावटीचा लाँचर बनवणार्‍या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केले होते. हा प्रकल्प भारताच्या अवकाश कार्यक्रमातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अवकाश संशोधन कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पहायला हवे. तसे झाले तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल, असे डॉ. सोमनाथ यांना वाटते.

अवकाश संशोधन हा आपल्या सगळ्यांसाठी कुतूहलाचा विषय असतो. त्यासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान, वेगवेगळ्या मोहिमा, उड्डाणे हे फार रंजक वाटते. यात अमेरिकेची नासा, भारताची इस्रो या अवकाश संशोधन संस्थांची भूमिका फार महत्त्वाची ठरत आली आहे. संस्थाइतकेच मोलाचे असते तिथं वर्षानुवर्षं काम करणार्‍या शास्त्रज्ञांचं संशोधन. माणूस चंद्रावर गेला, मंगळावर वस्ती करायची स्वप्न बघतोय हे सगळं बातम्यांमधून ऐकणं, वाचणं फार रंजक वाटते. पण त्यामागची शास्त्रज्ञांची प्रदीर्घ काळची मेहनत लाखमोलाची असते. भारतातल्या केरळच्या अशाच एका शास्त्रज्ञाची केंद्र सरकारने इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक केलीय. डॉ. एस. सोमनाथ असं त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे.

डॉ. सोमनाथ यांचा जन्म जुलै 1963 ला केरळच्या अल्लपी जिल्ह्यातल्या थुरावूर गावात झाला. त्यांचे वडील हिंदीचे शिक्षक होते. त्यांनीच आपल्या मुलाला प्रोत्साहन दिले. सोमनाथ यांचे प्राथमिक शिक्षण एर्नाकुलम इथल्या सेंट ऑगस्टीन हायस्कूलमध्ये झाले. इथल्याच महाराजा कॉलेजमधून त्यांनी पुढचं शिक्षण घेतले. टीकेएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. याच काळात त्यांनी काही रॉकेटविषयक अभ्यासक्रमही पूर्ण केले.

पुढच्या शिक्षणासाठी सोमनाथ यांनी बंगळुरूच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेची वाट धरली. इथं त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगमधे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यात सुवर्णपदकही पटकावले. पुढे 1985ला सोमनाथ यांची इस्रोच्या तिरुअनंतपूरममधल्या विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्रात निवड झाली. 30 वर्षं त्यांनी इथं काम केले. या केंद्रात त्यांना वेगवेगळ्या उपग्रह लाँचर प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली. पीएसएलव्ही हा त्यातलाच एक महत्त्वाचा प्रकल्प होता.

भारताने ध्रुवीय कक्षांतल्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी पीएसएलव्ही आणि भूस्थिर कक्षांतल्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी जीएसएलव्ही हे दोन लाँचर बनवले. हे लाँचर स्वदेशी बनावटीचे होते. भारतीय अवकाश संशोधनातला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हे लाँचर बनवण्यासाठी भारताने इतर कोणत्याच देशाची मदत घेतली नव्हती. त्यामुळेच इस्रोसाठी हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता.

पीएसएलव्ही हा स्वदेशी बनावटीचा लाँचर बनवणार्‍या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केलं होतं. त्याच्या पहिल्या यशस्वी उड्डाणात त्यांची मोलाची भूमिका होती. 1994 मध्ये या प्रकल्पाच्या काळात आलेल्या तांत्रिक अडचणी त्यांनी स्वतः पुढाकार घेत सोडवल्या होत्या.

डॉ. सोमनाथ यांची 2010 ला जीएसएलवी एम के 3 रॉकेटचे प्रकल्प संचालक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्याकडे उपग्रह आणि लाँचरच्या इंजिनवर काम करणार्‍या ‘लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर’ची जबाबदारीही देण्यात आली होती. तर 2018 ला विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्राचं प्रमुख संचालकपद त्यांच्याकडे आलं. त्यांना रॉकेटतज्ज्ञ म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं. इस्रोच्या रॉकेट विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. सोमनाथ लाँच व्हेहीकल डिझाईनिंगमध्ये मास्टर आहेत. यामधल्या लाँच सिस्टम इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल डिझाईन, स्ट्रक्चरल डायनेमिक आणि पायरोटेक्निकचेही तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जाते. इस्रोच्या नेमणुकीआधी जीएसएटी एमके हे लाँचर बनवण्याच्या कामात डॉ. सोमनाथ गुंतले होते. या लाँचरमुळे अवघड उपग्रह अवकाशात सोडणं शक्य होईल असं म्हटले जाते. तसंच रिमोट सेंसिंग उपग्रह लाँच करण्यासाठी जीएसएटी 6ए, पीएसएलव्ही सी41 यावरही डॉ. सोमनाथ यांचं काम चालू होतं. महत्त्वाचं म्हणजे पीएसएलव्हीच्या 11, तर जीएसएलवीच्या तीन मोहिमा त्यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

डॉ. सोमनाथ यांनी के. शिवन यांच्याकडून इस्रोची सूत्रे हाती घेतली आहेत. अवकाश कार्यक्रमातल्या क्रायोजेनिक इंजिनमधल्या योगदानासाठी के. शिवन यांना ‘रॉकेट मॅन’ म्हटलं जातं. चांद्रयान मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ती धुरा आता सोमनाथ यांच्या खांद्यावर आली आहे. विशेष म्हणजे जून 2018 ला डॉ. सोमनाथ ‘विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्रा’चे प्रमुख संचालक बनले होते. त्यावेळीही त्याची सूत्रे सोमनाथ यांनी के. शिवन यांच्याकडून घेतली होती.

अवकाश कार्यक्रमांमधल्या योगदानासाठी डॉ. सोमनाथ यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवलं गेलं आहे. ‘अ‍ॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेनं त्यांना ‘स्पेस गोल्ड मेडल’ दिले आहे. तर इस्रोनं ‘मेरिट अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘परफॉर्मन्स एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’नं त्यांचा सन्मान केला आहे. जीएसएलव्ही एमकेमध्ये त्यांच्या टीमने केलेल्या कामासाठी त्यांना ‘टीम एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ मिळाला. त्यांचे वेगवेगळ्या विषयांवरचे शोधनिबंधही प्रसिद्ध झालेत.

डॉ. सोमनाथ हे शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर आहेतच, पण त्याशिवाय ते एक उत्कृष्ट वक्‍तेही आहेत. वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले आहेत.

आदित्य एल 1, चांद्रयान 3 अशा अवकाश मोहिमा डॉ. सोमनाथ यांची वाट पाहतायत. ही वाट त्यांच्यासाठी सोपी नाही. पण आजपर्यंतच्या त्यांच्या अनुभवातून अवकाश कार्यक्रमांमध्येे चार चांद लावण्याचं आव्हान ते नक्क्ीच पेलतील. अवकाश तंत्रज्ञान ही खूप खर्चिक गोष्ट असल्याचं ते मान्य करतात. ते करताना त्यांनी त्यावरचा उपायही सांगितला आहे. अवकाश कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पाहायला हवं. तसं केलं तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल. पर्यायाने हे क्षेत्र उद्योग म्हणून उभं राहील. व्यवसाय आणि नफा यांची सांगड घालत अवकाश तंत्रज्ञानामधे व्यावसायिक उपक्रम विकसित करण्यावर भर द्यायला हवा असं त्यांनी सांगितलंय.

अमेरिकेतली नासा ही जगातली आजची आघाडीची अवकाश संशोधन संस्था आहे. त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असते. त्यांचं बजेटही तसंच आहे. त्यामुळेच या संस्थेचे अवकाश कार्यक्रम, तंत्रज्ञान हे त्याच दर्जाचं असतात. भारतातही त्याद‍ृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. लोकांनी गुंतवणुकीसाठी पुढे यायला हवं. त्यासाठी अवकाश संशोधनाकडे नव्या द‍ृष्टिकोनातून पहायला हवं असं डॉ. सोमनाथ यांना वाटते.

– अक्षय शारदा शरद

Back to top button