

सिंगापूर : वैज्ञानिकांनी एक नवे ब्रेथ अॅनालाझर तपासणी विकसित केली आहे जी स्वॅब न घेताच एखाद्या व्यक्तीला कोरोनाचे संक्रमण झाले आहे का याचा छडा लावू शकते. ज्या लोकांमध्ये कोव्हिडची कोणतीही लक्षणे नाहीत अशा लोकांमधील संक्रमणाचा छडाही या ब्रेथ अॅनालायजरच्या सहाय्याने केवळ पाच मिनिटांत लावता येऊ शकतो.
'एसीएस नॅनो' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की गर्दीच्या ठिकाणी किंवा लग्नसमारंभासारख्या कार्यक्रमांमध्ये या उपकरणाच्या सहाय्याने सहजपणे लोकांमधील संक्रमणाचे निदान करता येऊ शकेल. सध्या जगभर कोव्हिडच्या अचूक निदानासाठी 'आरटी-पीसीआर' तंत्राचा वापर केला जातो. त्यामध्ये नाक आणि तोंडातून घेतलेल्या स्वॅब नमुन्यांचा वापर होतो.
मात्र, सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे की या प्रक्रियेत तपासणीचे परिणाम समोर येण्यास वेळ लागतो. अनेकांना नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेणे असुविधाजनक वाटते. रॅपिड अँटिजेन तपासणीचा परिणाम लवकर समजतो; पण तो तितका अचूक नसतो. त्यामुळे हे हातात धरता येण्यासारखे ब्रेथ अॅनालायझर डिझाईन करण्यात आले. त्यामध्ये सेन्सर असलेली चिप आणि सिल्व्हर म्हणजेच चांदीच्या नॅनोक्यूब्ज लावण्यात आल्या आहेत.
ज्यावेळी एखादी व्यक्ती या उपकरणात दहा सेकंदांसाठी श्वास सोडते त्यावेळी सेन्सर त्याचे विश्लेषण करून त्याचे परिणाम दाखवतो. सिंगापूरच्या हॉस्पिटल्स व विमानतळांवर या अॅनालायझरचा 501 लोकांवर प्रयोग करण्यात आला. त्यामधून उत्साहवर्धक परिणाम समोर आले.
हेही वाचा