सावधान… ३१ डिसेंबर येतोय… | पुढारी | पुढारी

सावधान... ३१ डिसेंबर येतोय... | पुढारी

लवकरच  31 डिसेंबर येईल. बहुतेक मुलं ही 31 डिसेंबरला दारू प्यायला शिकतात… काय तर म्हणे एन्जॉय…. पार्टीचे प्लॅनिंग चालू झालं आहे. प्रत्येकाला विचारलं की का करतात रे हा दिवस साजरा, तर त्यांच्या तोंडून एकच वाक्य एन्जॉय. दारूच्या बाटल्या, नशेत नाचणारे ते मित्र…तिकडून  सिगरेटचा धूर…दोन बोटात 4  सिगरेट धरून ओढणारी ती मुलं… काय चालू आहे हे?  तिकडून 4-5 जण येतात आणि जो निर्व्यसनी असतो, त्याला घेराओ घालतात आणि दारूचं महत्व सांगू लागतात. त्याने नकार दिला की…तुला आपल्या दोस्तीची शपथ…आम्ही बेवडे नाही फक्त एन्जॉय म्हणून पितो.

असल्या गोष्टी करून त्याला नादाला लावले जाते. कधी कधी दारू पीत नाहीस? कसला मर्द रे तू? अशी वाक्ये बोलून डायरेक्ट पुरुषार्थावर सवाल उपस्थित केला जातो. बर या लोकांच्या पासून लांब राहणे अवघड. कारण जास्तीत- जास्त तरुण हे असेच असतात. दारू हे व्यसन नसून एन्जॉय करायचं एक मध्यम आहे, असा समज सर्वत्र प्रस्थापित केला जातोय. यात आपले लाडके बॉलिवूडपट  महत्वाची भूमिका बजावत आहे. प्रत्येक चित्रपटात दारूचा सीन असतोच. हिरो दारू पितो म्हणून त्याकडे आकर्षित होणारे पण कमी नाहीत…त्यात 100 टक्के हा वाईट संगत हिच कारणीभूत आहे.

बीअर पी आरोग्याला चांगली असते. इथपासून ते बीअर पी बॉडी बनते असे गैरसमज पसरवून मुलांना व्यसनी बनवायचे काम चालू आहे. पूर्वी एन्जॉय म्हणून बीअर पिणारी पोरं कधी देशी दारूपर्यंत आली कळलच नाही.  दारूड्याच्या सारखे तत्वज्ञान कोणीच देऊ शकत नाही. दारू पिण्याचे अनेक फायदे ते सांगून जातात. 4 दारू पिणारी असतील तर 5 वा निर्व्यसनी मित्र बहुतेक त्यांच्या डोळ्यात खूपत असतो.  म्हणून त्याला पण आपल्यात ओढून घेण्याचा सर्वोत्तपरी ते प्रयत्न करत असतात. म्हणून चांगली संगत महत्वाची. समाजात एन्जॉय करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. व्यसन हे माध्यम होऊ शकत नाही. तरुणांनी व्यसनात बरबाद होण्यापेक्षा आपल्या अंगातील जोश खेळात, कलेत, सैन्यात दाखवले तर त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन सुखी होईल.

Back to top button