टाय टाय फिस्सऽऽऽ  | पुढारी | पुढारी

टाय टाय फिस्सऽऽऽ  | पुढारी

संपूर्ण   राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थांची वाढलेली घालमेल… शिगेला पोहचलेली उत्सुकता… गुलाल उधळणीची आस… अन् मैदान मारण्यासाठी सज्ज असलेल्या विद्यार्थ्यांची दांडी गुल्ल झाली आहे.

महाविद्यालयात होणारा राडा, बाह्य राजकारणाचा वाढलेला हस्तक्षेप, तरुणांमधील चढाओढ या कारणांमुळे बंद झालेली विद्यार्थी परिषदेची निवडणूक 2017-18 मध्ये होणार असे म्हणता-म्हणता रद्द झाली. गेल्या सहा महिन्यांपासून घालमेल वाढविलेली विद्यार्थी परिषदेची खुली निवडणूक रद्द झाल्याचे न्यायालयाने जाहीर केले आणि गुणवत्तेच्या आधारावरच निवडणूक  होईल, असे सूतोवाच केले. त्यामुळे डोक्यावर टांगली तलवार असणार्‍या कॉलेज प्रशासनाचा मात्र  जीव भांड्यात पडला आहे.

कॉलेजमध्ये होणारी निवडणूक म्हणजे भविष्यातील कार्यकर्ते घडविणारी कार्यशाळा असते. मग यामध्ये बाहेरील हस्तक्षेप आला. गटा-तटाचे राजकारण तर आलेच, शिवाय पक्षपातही आला. त्यामुळे कॉलेजचे राजकारण हमरीतुमरीवर जायचे आणि प्रसंगी राडाही पहायला मिळायचा. त्यामुळे बंद झालेल्या निवडणूक यंदा मात्र होणार अशा आशेने सर्वच पक्षातील तरुण  युवकांची कॉलेजात जोमात तयारी सुरू होती. अगदी आपापले गट तयार करुन मोर्चेबांधणीही सुरू होती.

परंतु निवडणूक रद्द झाली अन् सगळेच टाय टाय फिस्सऽऽऽ झाले. महाविद्यालयांमध्ये निवडणूक घेण्यामागचा एकच हेतू असतो की भविष्यात चांगले कार्यकर्ते घडावेत. चांगले समाजसेवक बनावेत. त्याची सुरुवात कॉलेजपासून व्हावी. परंतु याचा अनेक प्रकारांनी गैरप्रकार वाढत गेला आणि गुणवत्तेवर आधारे निवडणूक होऊ  लागल्या. पण ज्याला खरच कॉलेजसाठी काहीतरी करायचे आहे, विद्यार्थ्यांसाठी योजना राबवायच्या आहेत त्या विद्यार्थ्यांचा पत्ता मात्र कट झाला आहे. तर जो हुशार आहे, ज्याची गुणवत्ता आहे, तोच आता विद्यार्थी परिषदेवर निवडून जाणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी हुशार असलाच पाहिजे. त्याचबरोबर त्याला विद्यार्थ्यांच्या अडचणींची जाणिवही असली पाहिजे, त्याने विद्यार्थ्यांसाठी खटाटोप केली पाहिजे,  कॉलेजमधील विद्यार्थ्यांबरोबर त्याचा उत्तम जनसंपर्क असला पाहिजे, प्रतिनिधी म्हणून आपण कोणी वेगळे नसून आपण विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणारा मोहरा असल्याची जाणिव त्यास असली पाहिजे.

या निवडणुकांमध्ये जो हुशार आहे त्याच्याचकडे प्रतिनिधीत्व जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आपला प्रतिनिधी धाडसी आणि रोखठोक असायला हवा, आपल्या प्रश्‍नांना तड लावणारा असायला हवा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांची असते. पण ज्याच्या हाती धुरा सोपविण्यात येणार आहे त्यानेच जर कच खाल्ली तर विद्यार्थी परिषेदेचा काय उपयोग, अशी भावना विद्यार्थ्यांतून व्यक्त होत आहे. खुल्या निवडणूक  रद्द झाल्याने  नव्याने तयार झालेले दादा, भाऊ, भैय्या यांची हवा मात्र गुल्ल झाली आहे.

– स्वप्निल पाटील, मिरज 

Back to top button