बॉस होताना… | पुढारी

बॉस होताना...

बर्‍याचदा तरुणींना स्वत:च्या क्षमतेविषयी विश्वास नसतो, पण तरीही त्यांनी नोकरीची संधी दवडता कामा नये. आपल्यातील बलस्थाने ओळखून अधिक चांगल्या जॉबसाठी किंवा अधिक वेतन मिळवण्यासाठी त्यांनी चर्चा करायला हवी. तुम्ही स्त्री असल्यामुळे अधिक जबाबदारी स्वीकारणे किंवा तुमच्या कंपनीच्या तुम्ही मॅनेजर होणे हे विशेष असते, हे लक्षात घ्या.

त्या कंपनीत तुम्ही अनेक वर्षे काम केले असेल आणि तुम्हाला कामाच्या सगळ्या खाचाखोचा माहीत असतील तर मॅनेजर होण्यात अवघड असे काय आहे, असे तुम्हाला वाटत असेल, पण ती जबाबदारी स्वीकारली की लक्षात येते की हे काम वाटले होते त्यापेक्षा कितीतरी अधिक आव्हानात्मक आहे. मॅनेजर किंवा कंपनीत बॉस झाल्यानंतर कोणत्या आव्हानांना आपल्याला सामोरे जावे लागेल याचा विचार करून हे पद कसे सांभाळायचे याविषयीच्या काही टिप्स

बोलायला शिका

अनेक महिला मिटिंगमध्ये फारसे बोलत नाहीत. मिटिंगमध्ये जर महिलांची संख्या कमी असेल तर त्या बोलतच नाहीत. पण असे करू नका. तुमच्या मनातील संकल्पना व्यक्त करा. तुम्ही गप्प राहिलात तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. संबंधित मुद्द्याबद्दल तुम्ही काय विचार करता हे स्पष्टपणे मांडा. तुमच्या मनात काय आहे ते जवळच्या सहकार्‍याशी आधी हवे तर बोला आणि मग मिटिंगमध्ये विषय मांडा. यामुळे तुमच्या कल्पनांवर इतरांचा प्रतिसाद मिळणेही सोपे होईल.

संबंधित बातम्या

रणनीती आखा

अनेकदा महिला स्वत:ची क्षमता सिद्ध करून दाखवण्याच्या नादात अंगावर जबाबदार्‍या घेतात. समोर येणार्‍या प्रत्येक प्रोजेक्टला त्या हो म्हणतात. त्या तुलनेत पुरुष त्यांना हवे ते प्रोजेक्ट बरोबर निवडतात. विशेष करून ज्यातून त्यांचे नाव पुढे येईल असे प्रोजेक्टच ते निवडतात. म्हणूनच महिलांनी कोणताही प्रोजेक्ट समोर आला की स्वत:लाच विचारावे, यातून मला काय मिळणार आहे? जर त्या प्रोजेक्टमधून करिअरला सहाय्यकारी ठरेल असे काही मिळणार नसेल आणि तुमच्याकडे पुरेसे काम असेल तर नाही म्हणायला घाबरू नका.

अपेक्षा समजून घ्या

अपेक्षा समजून घेणे हे चांगल्या नेतृत्वाचे लक्षण आहे. तुमच्या हाताखालच्या माणसांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि त्यांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत याचे चित्र तुमच्या मनात स्पष्ट असायला हवे. हाताखालच्या माणसांबरोबर अगदी मोकळेपणाने संवाद साधणे अतिशय गरजेचे असते. तुम्हाला त्यांच्याकडून कसे काम व्हायला हवे आहे, त्यांना स्पष्टपणे सांगा. त्यासाठी आठवड्यातून, महिन्यांतून मिटिंग्ज ठेवा.

गरज असल्यास टीका करा

एखाद्या ठिकाणी आवश्यकता वाटल्यास टीकात्मक टिप्पणी करायला कचरू नका. याबाबतीत आपण स्त्री आहोत, ही भावना बाजूला ठेवा. तुमची प्रामाणिक आणि सकारात्मक टीका ही ते काम सुधारण्यास सहाय्यभूत ठरेल.

भावनाशील होऊ नका

सर्वसाधारणपणे कामाच्या ठिकाणी भावना व्यक्त करणे हे दुबळेपणाचे लक्षण मानले जाते. शिवाय हे खास बायकी मानले जाते. त्यामुळे त्याबाबतीत मनावर ताबा ठेवा. अनेकदा महिला व्यवसाय करताना अनेक गोष्टी वैयक्तिकरीत्या घेतात आणि त्याचा त्यांना मानसिक त्रास होतो. त्यावर त्या भावनिकतेने प्रतिक्रिया देतात. हे योग्य नाही. (करिअर)

मृणाल सावंत 

Back to top button