हेअर मास्कची जादू | पुढारी

हेअर मास्कची जादू

केसांचे सौंदर्य ते किती निरोगी आहेत यावर अवलंबून असते. कमजोर, निस्तेज केस आपले सौंदर्य बिघडवतात. केसांचे सौंदर्य टिकवायचे असेल, तर त्यांची निगाही व्यवस्थित राखली गेली पाहिजे. केसांची निगा राखण्याचे काही घरगुती उपाय…

कोकोनट अँड क्रीम मास्क

हा मास्क कोरड्या केसांना मुलायम करण्यासाठी आहे. तो घरात सहजपणे तयार करता येतो. दोन चमचे खोबरेल तेलात एक चमचा ऑलिव्ह ऑईल घालून केसांच्या मुळांपासून शेंड्यांपर्यंत लावा. लावल्यानंतर शॉवर कॅप घाला. अर्धा ते एक तास ठेवा. नंतर माइल्ड हर्बल शांपूने धुवा आणि कंडिशनरही करा.

संबंधित बातम्या

बनाना क्रीम मास्क

हा मास्क कमजोर आणि तुटलेल्या केसांसाठी आहे. केळांंमुळे केस मजबूत होतात आणि कमजोर झालेल्या केसांच्या मुळात नवी चेतना आणतात. यातील लोह आणि जीवनसत्त्वांमुळे केसांना योग्य पोषण मिळते.

हा मास्क तयार करण्यासाठी एक पिकलेले केळ मिक्सरमधून ब्लेंड करून घ्या. त्यात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण डोक्याची त्वचा आणि केसांना चांगल्या तर्‍हेने लावा. पंधरा ते वीस मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. मध नैसर्गिक कंडिशनर आहे. तो केसांना मुलायम आणि निरोगी राखण्यात मदत करतो.

ओटमील हेअर मास्क

डोक्याच्या तेलकट त्वचेसाठी हा मास्क चांगला आहे. केसातील कोंड्याची समस्याही या मास्कने दूर होते आणि डोक्याच्या त्वचेची होणारी आगही शांत होते. केसातील अतिरिक्त तेल हा मास्क शोषून घेतो आणि हा नियमितपणे लावल्याने केस चांगले वाढतात. हा मास्क तयार करण्यासाठी एक चमचा ओटमीलमध्ये 1 चमचा ताजे दूध आणि एक चमचा बदामाचे तेल घालून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट हळूहळू केस आणि डोक्याची त्वचा यांना लावा. पंधरा ते वीस मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. आणखी चांगला परिणाम होण्यासाठी हा मास्क लावल्यावर पाण्यात लिंबाचा रस घालून ते पाणीही केसांना लावू शकता.

Back to top button