‘ती’ला समजून घ्या | पुढारी | पुढारी

‘ती’ला समजून घ्या | पुढारी

प्रत्येक मुलगी वयात आल्यावर कमी-जास्त प्रमाणात आपल्या भावी पतीविषयी स्वप्न रंगवत असते आणि प्रत्यक्षात लग्न झाल्यावर ती आपल्या पतीमध्ये स्वतःच्या वडिलांची भूमिकाही शोधत असते. ती वडिलांची प्रतिमा तिला पतीमध्ये नाही सापडली तर, ती बेचैन होते. तिला असुरक्षिततेची भावना येते. लग्नानंतर पती हा सर्वस्व. सर्व आयुष्य त्याच्याभोवती ओवाळायला तयार असते. त्याचप्रमाणे मुलगा हा कमवायला लागल्यावर त्याच्या आपल्या भावी  पत्नीकडून काही अपेक्षा असतात. लग्नानंतर तो स्वतःच्या आईला आपल्या पत्नीमध्ये शोधत असतो. तू हे आईकडून शिकून घे, आई करते तसा हा पदार्थ नाही झाला वगैरे…

पण, खरे पाहता ह्या दोन्ही व्यक्‍ती भिन्न घरातून, भिन्न संस्कारातून आलेल्या असल्याने खाण्यापिण्याच्या पद्धती/सवयी वेगवेगळ्या असू शकतात. विचारही वेगळे असू शकतात. मुळात व्यक्‍तीपरत्वे ही भिन्नता नेहमीच राहणार, हे सर्वप्रथम मान्य करायला हवे. एकमेकांपरत्वे अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाही तर कुरबुरी निर्माण व्हायला सुरुवात होते.

ह्याचा तोडगा म्हणजे दोघांनीही एकमेकांना गुणदोषांसकट आहे तसे स्वीकारायला हवे. विचारांमध्ये, वागण्यामध्ये लवचिकता असणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

फक्‍त ती एक स्त्री म्हणून आपलं स्वतःचं कुटुंब सोडून परगावी वा परक्या घरी आलेली आहे, याचं भान असणे गरजेचे आहे. पतीची साथ असेल तर संसार फुलायला वेळ लागत नाही. पती-पत्नीचे आपापसात विश्वासाचे-प्रेमाचे नाते असल्यास तिला तिथे परक वाटणार नाही. लग्नानंतर माहेर सोडून सर्वप्रथम ती आपल्या पतीसाठी व मग मागावून पतीच्या परिवारासाठी आलेली असते. तिला सगळ्या अपेक्षा वा नातेसंबंधांची कल्पना व विश्वासाची जाणीव  करून दिल्यास हे सगळे नवीन नातेसंबंध  समजून  घ्यायला वेळ दिल्यास तिला प्रचंड मानसिक आधार मिळतो  व संसार बहरायला वेळ लागत नाही. लग्नानंतर  सुरुवातीपासूनच एकमेकांना समजून व प्रसंगी एकमेकांना त्यांचा त्यांचा वेळ(स्पेस) दिल्यास नातेसंबंध घट्ट होण्यास मदत होते.

Back to top button