स्त्री जन्मा ही… स्त्रियांमधील नैराश्य | पुढारी

स्त्री जन्मा ही... स्त्रियांमधील नैराश्य

निसर्गाने स्त्री आणि पुरुषांना एकमेकांपेक्षा वेगळे बनवले आहे आणि हे वेगळेपण केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक पातळीवरही असते, हे सर्वमान्य आहे. स्त्रियांच्या मज्जासंस्थेच्या कार्यामध्ये मानसिक आघात झाल्यावर जी प्रतिक्रिया उमटते ती पुरुषांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण होण्याचे प्रमाण जास्त असते, असे आता सहप्रयोग सिद्ध झाले आहे.

मानवी आयुष्यात दु:खाचे, उदासीनतेचे अनेक प्रसंग येतच असतात. बर्‍याचदा त्यांची मनावरची पडछाया काही काळात आपोआप दूर होते. उदासपणाची व दुःखद भावनेची अवस्था कोणत्याही कारणाशिवाय दीर्घकाळ टिकून राहिली तर त्याचं रूपांतर नैराश्य किंवा डिप्रेशन या गंभीर आजाराकडे होते. जागतिक आकडेवारीनुसार, नैराश्याच्या आजाराचे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांच्या दुपटीने आढळते. 

हॉर्मोन्सच्या पातळीमधील चढउतार, अनुवंशिकता, सामाजिक कुचंबणा आणि वैयक्‍ति अनुभव तसेच त्यांच्या आयुष्यातील विशिष्ट टप्पे त्यांना नैराश्याच्या गर्तेत लोटायला कारणीभूत ठरतात. या आजारात त्या व्यक्‍तीच्या भावना, विचार आणि दैनंदिन व्यवहार विचलित होतात. त्यांचे बोलणे, झोप, खाणे-पिणे असे नित्य व्यवहार पूर्णपणे बदलतात.

संबंधित बातम्या

लायकी आणि कर्तबगारी असून देखील स्त्रियांना मिळणारा दुय्यम दर्जा त्यांच्या नैराश्याचे कारण बनतो. जबाबदार्‍या, घर, ऑफिस यामध्ये होणारी धावपळ स्वतःच्या आवडी, छंद याला वेळ देता न येणे यामुळे त्या कुचंबून जातात. समाजात अगदी कोवळ्या वयापासून होणारे लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार, लैंगिक दुरुपयोग यामुळे त्यांचे भावविश्व नष्ट होत राहते.

याव्यतिरिक्‍त पौगंडावस्थेत लैंगिक संप्रेरकामुळे मुलींना मासिक पाळी येते. यामध्ये शारीरिक बदलाबरोबर मानसिक बदलांनादेखील तिला सामोरे जावे लागते. मूड स्विंग दिसून येतात. गरोदरपण, बाळंतपण व रजोनिवृत्ती अशा स्त्री जीवनातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्वतःशी मानसिकरित्या लढत असते. तेव्हा तिची होणारी चिडचिड, राग हा काही काळापुरतेच मर्यादित असतो. तेव्हा त्या काळात मानसिक आधाराच्या शोधात ती असते. आणि ती हाक घरच्यांनी वेळीच समजून घेतल्यास नैराश्य येण्यापासून ती वाचू शकेल.

Back to top button