सुकोमल मानेसाठी | पुढारी | पुढारी

सुकोमल मानेसाठी | पुढारी

आपण चेहर्‍याच्या सौंदर्याची भरपूर काळजी घेतो. तर्‍हेतर्‍हेचे पॅक, क्रीम चेहर्‍याला लावतो. पण, सौंदर्याचाच महत्त्वाचा भाग असणारी मान मात्र दुर्लक्षित करतो. कोमल आणि नितळ मान म्हणजे सौंदर्याचे लक्षण मानले जाते. वाढत्या वयाचा प्रभाव सर्वात प्रथम मानेवरच दिसू लागतो. म्हणूनच चेहर्‍याबरोबरच सौंदर्याच्या दृष्टीने मानेचीही काळजी घेणे गरजेचे असते. मानेकडे दुर्लक्ष होत राहिले तर चेहरा आणि मान यांच्या त्वचेच्या रंगात फरक पडतो. 

मानेची काळजी घेणे फारसे अवघड नसते. पण, त्यासाठी अधूनमधून काही उपाय करणे गरजेचे असते. उदा. मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी वाटून घ्यावी. त्यात मध किंवा दही एकत्र करून ते मिश्रण मानेवर लावावे. पंधरा-वीस मिनिटे तसेच ठेवून नंतर अंघोळ करावी. यामुळे मानेचा काळेपणा दूर तर होतोच शिवाय त्वचाही चमकदार होते. फेसपॅक लावताना तो केवळ चेहर्‍यावरच लावू नये. चेहर्‍याबरोबरच संपूर्ण मानेलाही तो लावावा. 

त्यामुळे दोन्हींची त्वचा सारखी रहायला मदत होते. काकडीची पेस्ट बनवून त्यात थोडंसं दही मिसळावं. हे मिश्रण मानेवर लावल्यास मानेवरचे डाग दूर होतात. मानेचे सौंदर्य राखण्यासाठी आणखी एक घरगुती सोपा उपाय म्हणजे दुधाच्या साईमध्ये लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण मानेभोवती मसाज करून जिरवावे. त्यामुळे मान मुलायम होते आणि कांतीही उजळ होते. मानेच्या स्वच्छतेसाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये. 

संबंधित बातम्या

चेहर्‍याचे क्लिझींग रोज करत असाल तर आठवड्यातून किमान दोनदा तरी मानेचे क्लिझींग करावे. यामुळे घामामुळे आलेला काळपटपणा दूर होतो. याबरोबरच मानेचे काही साधे सोपे व्यायामही करावे. 

व्यायामामुळे मान लवचिक राहते आणि मानेचे स्नायू घट्ट राहतात. अशा प्रकारे नियमितपणे मानेची काळजी घेतली तर सुकोमल नितळ मानेचे तुम्ही धनी व्हाल. 

Back to top button