केसांना मेंदी का लावायची ? | पुढारी

केसांना मेंदी का लावायची ?

मेंदी आपल्या सौंदर्य प्रसाधनातील एक महत्त्वाची वनस्पती आहे. प्राचीन काळापासून हातापायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी मेंदीचा वापर होतो. पण, मेंदीचा केवळ सौंदर्य वाढविण्यासाठीच उपयोग होतो असे नाही, तर मेंदीचे औषधी गुणही आहेत आणि केसांसाठी मेंदी अतिशय उपयुक्‍त असते. केसांचे आरोग्य आणि सौंदर्य दोन्हींसाठी मेंदी उपयुक्‍त आहे. 

निरोगी केस

मेंदीचा पॅक महिन्यातून दोन वेळा केसांना लावा. त्यामुळे तुमचे केस निरोगी, चमकदार आणि दाट होतील. आपल्या केसांचे नैसर्गिक संतुलन न बिघडवता टाळूवरील आम्ल-अल्कचे संतुलन मेंदीमुळे व्यवस्थित होते. खराब झालेले केस मेंदीमुळे चांगल्या निरोगी स्थितीत येतात. आवळा घातलेल्या पाण्यात मेंदी दोन तास भिजवून ठेवा आणि मग केसांना लावा. 

केसांचा कंडीशनर

तुमच्या केसांसाठी मेंदी एक चांगला कंडीशनर आहे. मेंदी तुमच्या सगळ्या केसांमध्ये पसरते आणि एक संरक्षक थर तयार करते, त्यामुळे तुमचे केस खराब होत नाहीत. मेंदी नियमित वापरल्याने तुमचे केस दाट आणि मजबूत होतात. तसेच, केसांत ओलसरपणाही राहतो. मेंदीमुळे केसांना नैसर्गिक चमक येते आणि तुमचे केस दुपटीने मजबूत होतात. 

संबंधित बातम्या

•पांढरे केस लपवते

कृत्रिम डायमुळे केसांची हानी होते. मेंदी हा त्यावरील एक उत्कृष्ट उपाय आहे. मेंदीत अ‍ॅमिनो अ‍ॅसिड किंवा अन्य कोणतेही रसायन नसते. दोन चमचे सुका आवळा, एक चमचा चहा आणि दोन लवंगा घालून पाणी उकळा. ते गाळून मेंदीत घाला, दोन तास ठेवा आणि मग केसांना लावा. 

कोंड्यावर उपाय

केसात होणारा कोंडा ही मोठी समस्या असते. मेंदी कोंड्याचा बंदोबस्त प्रभावीपणे करते. दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते बारीक करा. मोहरीचे तेल थोडे गरम करा आणि त्यात मेंदीची काही पाने टाका. हे तेल थंड झाल्यावर त्यात मेथीच्या दाण्यांची पेस्ट घाला. तेलाचे हे मिश्रण हवे तर तुम्ही गाळून घेऊ शकता. पण तसे करण्याची गरज नाही. हे मिश्रण केसांच्या मुळाशी आणि टाळूला लावा. एका तासाभराने शांपूने केस धुवा. 

Back to top button